ऑनलाईन टीम / मुंबई :
घाटकोपरमध्ये आज सायंकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते मनसे कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. त्यासाठी राज ठाकरे यांच्या स्वागताचे भलेमोठे फ्लेक्स घाटकोपर परिसरात लावण्यात आले आहेत. या फ्लेक्सवर राज ठाकरे यांचा उल्लेख हिंदुहृदयसम्राट असा करण्यात आला आहे. त्यामुळे या फ्लेक्सची चर्चा आता राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.
मनसेचे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी घाटकोपर, चेंबूर परिसरात राज ठाकरेंच्या स्वागताचे फ्लेक्स लावले आहेत. या फ्लेक्सवर राज ठाकरे यांच्या नावासमोर हिंदूहृदयसम्राट म्हटले आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना आता मनसेने शिवसेनेचा हिंदुत्वचा मुद्दा हाती घेतलाच होता, त्यातच थेट राज ठाकरे यांचा बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा हिंदूहृद्यसम्राट उल्लेख करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शिवसैनिक हिंदुहृदयसम्राट म्हणत होते. पण आता मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेत राज ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट म्हटलं आहे. याआधी राज ठाकरे यांचा मराठी हिंदुहृदयसम्राट असा उल्लेख केला जात होता. त्यावेळी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना खडसावलं होतं, त्यामुळे आता या फ्लेक्सवर राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.