राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मशिदवरील भोंग्याविरोधात मनसैनिक आक्रमक
ऑनलाईन टीम तरुण भारत
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (maharashtra navnirman sena) प्रमुख राज ठाकरे (raj thackeray) यांची शनिवारी २ एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कमध्ये (shivaji park) जाहीर सभा झाली. दोन वर्षांनी मनसेचा पाडवा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे राज ठाकरे दोन वर्षांनंतर काय भाषण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान, प्रत्यक्षात राज ठाकरेंच्या भाषणाला सुरुवात झाली आणि प्रामुख्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीवर जोरदार निशाणा साधला. तसेच मुखयमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) आणि राष्टवादीचे नेते शरद पवार (sharad pawar) यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. याशिवाय बऱ्याच मुद्द्यांवरून त्यांनी सरकारला लक्ष्य केलं. तर यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी मशिदवरील लावल्या जाणाऱ्या भोंग्याला विरोध करत मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील. नाहीतर ज्या मशिदीबाहेर हे भोंगे लागतील, त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावायची, असे सांगितले. यांनतर लगेच मनसैनिकांनी आज राज ठाकरेंचा हा आदेश मानत घाटकोपरमध्ये स्पीकरवर हनुमान चालीसा वाजवण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, काल शिवाजी पार्कवर झालेल्या सभेत राज ठाकरे बोलताना म्हणाले की, “कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेला माझा विरोध नाही, पण मशिदीवर लावलेले भोंगे खाली उतरावेच लागतील. राज्य सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल. नाहीतर ज्या मशिदीबाहेर हे भोंगे लागतील, त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावायची. मी धर्मांध नाही, तर धर्माभिमानी आहे, कोणत्याही धर्मात लाऊडस्पीकरचा नियम नाही. जेव्हा धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का, सर्वांनी आपला धर्म घरात ठेवावा,” असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मशिदवरील भोंग्याविरोधात मनसैनिक आक्रमक झाले असून घाटकोपरमध्ये मनसेकडून स्पीकरवर हनुमान चालीसा वाजवण्यास सुरुवात झाली आहे.