ऑनलाईन टीम / मुंबई :
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते आज मुंबईतील चांदीवली आणि गोरेगावमध्ये पक्षाच्या शाखांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी गोरेगावच्या शाखा क्रमांक 40 च्या उद्घाटन समारंभासाठी उभारण्यात आलेले स्टेज अचानक कोसळले. त्यावेळी काही महिला व्यासपीठावरून खाली कोसळल्या. मनसेच्या कार्यकर्त्यांनी या महिलांना तातडीने बाहेर काढले. सुदैवाने या महिलांना कोणतीही दुखापत झाली नाही.
चांदीवली येथील शाखेचे उद्घाटन झाल्यानंतर राज ठाकरे गोरेगाव येथील शाखेच्या उद्घाटनासाठी पोहचले. तेथे कार्यकर्त्यांची मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती. तेथे कार्यालयाच्या शेजारीच एक स्टेज उभारण्यात आला होता. त्यावर राज ठाकरे, बाळा नांदगावकर यांच्यासह मनसेचे इतर नेते आणि स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. पण स्टेजवर क्षमतेपेक्षा अधिक कार्यकर्ते आल्यानं स्टेजचा पुढील भाग कोसळला. त्यावेळी काही महिला व्यासपीठावरून खाली पडल्या. मनसेच्या कार्यकर्त्यांनी या महिलांना तातडीने बाहेर काढले. सुदैवाने या महिलांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.
दरम्यान, येथील उद्घाटनानंतर राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. ते म्हणाले, मनसेच्या शाखेत समस्या घेऊन येणाऱया प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे. ही आपल्यावरची मोठी जबाबदारी आहे. मनसेच्या शाखा या राजकीय दुकानं होता कामा नये, तर या शाखा न्यायालय झाल्या पाहिजे, अशी अपेक्षाही राज ठाकरे यांनी व्यक्त केली.