ऑनलाईन टीम / मुंबई :
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे दोघे आज नाशिकमध्ये असल्याने पुन्हा एकदा भाजप-मनसे युतीच्या चर्चेला उधाण आले आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते व एकेकाळचे राज ठाकरे यांचे शिलेदार प्रवीण दरेकर यांनी आज याबाबत सकारात्मक वक्तव्य केले आहे.
आमचे नेते देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांनी याआधीही मनसेशी युतीबाबत आपली भूमिका मांडली आहे. मनसेने परप्रांतीयांबाबतची संकुचित भूमिका सोडून द्यावी. तसेच, भाजपची हिंदुत्वाची भूमिकाही मनसेला मान्य असणे गरजेचे आहे, असे आमच्या नेत्यांनी यापूर्वीच सांगितले आहे.
पुढे ते म्हणाले, भाजपची भूमिका व राज ठाकरे यांची भूमिका यावर चर्चा होऊ शकते. आज राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील हे दोन्ही वरिष्ठ नेते नाशिकमध्ये आहेत. ते एकमेकांना भेटू शकतात. पण या संदर्भातील नेमकी माहिती चंद्रकांत पाटीलच देऊ शकतील, असे दरेकर म्हणाले.
दरम्यान, कुरारमध्ये झोपडपट्टीवासियांवर करण्यात आलेल्या कारवाईवर दरेकर यांनी संताप व्यक्त केला. आमचा विकास कामांना विरोध नाही. पण पावसात जुल्मी पद्धतीने कारवाई करणे योग्य नाही, असेही दरेकर म्हणाले .