ऑनलाईन टीम / मुंबई :
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल एक फेसबुक पोस्ट करत कार्यकर्त्यांना वाढदिवसानिमित्त गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही शिवसैनिकांना एक आवाहन केले आहे. यंदा माझ्या वाढदिवसानिमित्त कोणताही कार्यक्रम, सोहळा करण्याचे टाळत आहे. आपण मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी येऊ नये, अशी विनंती आदित्य ठाकरेंनी केली आहे.
उद्या, 13 जून रोजी आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांडून विविध उपक्रम राबवले जातात. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय आदित्य ठाकरेंनी घेतला आहे. ट्टिवरवर एक पोस्ट शेअर करत त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.
आदित्य ठाकरे यांची ट्विटरवरील पोस्ट :
मागील वर्षापासून आपण कोरोनाच्या महासंकटाशी लढत आहोत आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले. आपल्याला आता संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज व्हायचे आहे. मास्क लावणे, अंतर पाळणे, गर्दी होऊ न देणे हा या आजाराला हरवण्याचा हमखास उपाय आहे. त्यामुळेच यंदा माझ्या वाढदिवसानिमित्त कोणताही कार्यक्रम, सोहळा करण्याचे टाळत आहे, असे आदित्य यांनी म्हटले आहे.
माझी आपणा सर्वांना हीच विनंती आहे की कृपया कुठेही गर्दी करु नका. आपण मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी येऊ नये, ही नम्र विनंती. आपण प्रत्यक्ष भेटला नाहीत तरी आपणा सर्वांच्या शुभेच्छा, प्रेम, आशीर्वाद माझ्यासोबत आहेतच आणि त्या कायम राहतील, हा विश्वासही आहे. वाढदिवसानिमित्त होर्डिंग्स, हार, केक अशा गोष्टींवर खर्च करू नये, असेही मला मनापासून वाटते. त्याऐवजी कोरोनाला हरवण्यासाठीचे नियम पाळणे, इतरांना शक्य ती मदत करणे हीच वाढदिवसाची अमूल्य भेट!
घरी रहा, सुरक्षित रहा,
आपला नम्र,
आदित्य ठाकरे .