- स्वागताला आलेल्या माजी महापौरांना म्हणाले ‘मास्क काढा’
ऑनलाईन टीम / नाशिक :
महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे सरकारकडून देखील सोशल डिस्टन्सिंग राखण्यासह मास्क लावण्यासंदर्भात वेळोवेळी निर्देश दिले जात आहेत. असे असतानाही मनसे प्रमुख राज ठाकरे मात्र जागोजागी विना मास्क फिरत असल्याचे दिसून येत आहे.
एका कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये आलेले राज ठाकरे आज पुन्हा विना मास्क दिसून आले. एवढेच नाही तर राज ठाकरे यांनी यावेळी त्यांच्या स्वागताला आलेल्या माजी महापौरांना ‘मास्क काढा’ अशा सूचनाही दिल्या.
आज राज ठाकरे नाशिकमध्ये आहेत. ते नाशिकमध्ये आल्यानंतर त्यांचं स्वागत करण्यासाठी माजी महापौर अशोक मुर्तडक समोर आले. यावेळी बुके देऊन स्वागत करताना राज ठाकरे यांनी त्यांना इशारा करत मास्क काढण्याच्या सूचना दिल्या.
राज ठाकरे यांनी यापूर्वीही अनेक ठिकाणी विनामास्क हजेरी लावल्याचे दिसून आले आहे. तसेच मी मास्क घालणार नाही, असे देखील त्यांनी सांगितले होते. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मनसेच्या मराठी स्वाक्षरी मोहिमेच्या कार्यक्रमाला देखील ते विनामास्क उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी म्हटले होते की, सगळ्या कार्यक्रमांना गर्दी होते. सरकारच्या कार्यक्रमांना गर्दी होते. ते तिथे धुडघुस घालू शकतात. शिवजयंती, मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमांना परवानगी नाकारली जाते. एवढे जर कोरोनाचे संकट पुन्हा वाढते आहे असे दिसत असेल तर सगळ्या निवडणुका पुढे ढकला, असेही त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले तसेच मी मास्क घालतच नाही, मी तुम्हालाही सांगतो, असेही राज ठाकरे म्हणाले होते.