ऑनलाईन टीम / मुंबई :
मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नंतर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील आता महाराष्ट्र राज्यातील जिम, रेस्टॉरंट आणि क्लासेस उघडण्याची मागणी केली आहे. त्यांनी ट्विट करत ही मागणी केली आहे.
ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, कोरोनाबाबत सरकार सर्व प्रयत्न करत असतानाही काहीजण नियमांकडं दुर्लक्ष करतात.पण लोकांची काळजी घेण्याची दक्षता रेस्टॉरंट/जीम/क्लास चालक घेत असतील तर त्यांना परवानगी देण्यास हरकत नाही,असं माझं व्यक्तिगत मत आहे. याबाबत सरकारने योग्य निर्णय घ्यावा, ही विनंती व घेतला जाईल असा विश्वास आहे, असे म्हटले आहे.
यापूर्वी सुप्रिया सुळे यांनी राज्यातील जिम सुरू करावीत अशी मागणी करताना आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील जिम अजूनही बंद आहेत. पण आता अनलॉकची प्रक्रिया सुरु असल्याने जीम पुन्हा सुरु करणे आवश्यक आहे. तसेच राज्यातील अनेक जिम चालकांनी यामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे, त्यामुळे आता लवकरात लवकर जिम सुरू करावीत.
तर याआधी काही जिम मालक आणि बॉडीबिल्डर्सनी राज ठाकरे यांची भेट घेऊन ठाकरे सरकारकडे जिम सुरु करण्याचा मुद्दा उचलून धरण्याची विनंती केली होती. त्यावेळी राज ठाकरे यांनी, तुम्ही जिम ओपन करा, बघू काय होतं असा सल्ला दिला होता.