लेखक आणि गीतकार मनोज मुंतशिर निर्मात्याच्या भूमिकेत शिरणार आहेत. 18 व्या शतकातील मालवाच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट ते तयार करणार आहेत. मुख्य भूमिकेसाठी अभिनेत्री प्रियांका चोप्राची निवड करण्याची इच्छा आहे. प्रियांका अशाप्रकारच्या व्यक्तिरेखा आत्मविश्वासासह साकारत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
बाजीराव मस्तानी या चित्रपटात प्रियांकाने साकारलेल्या काशीबाईंच्या व्यक्तिरेखेत कुठलीही कमतरता नव्हती असेही ते म्हणाले आहेत. पण मुंतशिर यांनी अद्याप प्रियांका चोप्राशी संपर्क साधलेला नाही. चित्रपटाची पटकथा अद्याप प्राथमिक टप्प्यात आहे. पटकथेला आकार मिळताच प्रियांकाशी संपर्क साधणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. चित्रपटाचे चित्रिकरण चालू वर्षाच्या अखेरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे.
प्रियांका चोप्रा सध्या नवरा निक जोनाससह लंडन येथे वास्तव्यास आहे. विवाह झाल्यापासून प्रियांकाचे भारतातील वास्तव्य खूपच कमी राहिलेले आहे. तसेच तिने आता हॉलिवूडमध्ये जम बसविला असल्याने बॉलिवूडमधील सहभाग कमी केला आहे.