वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एफआयएच महिलांच्या प्रो लीग हॉकी स्पर्धेतील आगामी होणाऱया टॉप सीडेड हॉलंडविरूद्धच्या सामन्यासाठी हॉकी इंडियाने मंगळवारी 22 सदस्यांचा महिला हॉकी संघ जाहीर केला. या संघामध्ये हुकमी स्ट्रायकर राणी रामपालचे पुनरागमन झाले असून गोलरक्षक सविताकडे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे.
भारत आणि हॉलंड महिला हॉकी संघातील पहिला सामना येत्या शुक्रवारी तर दुसरा सामना येत्या शनिवारी भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर खेळविला जाणार आहे. या सामन्यासाठी घोषित करण्यात आलेल्या भारतीय महिला हॉकी संघामध्ये महिमा चौधरी आणि ऐश्वर्या राजेश चौहान या दोन नव्या चेहऱयांचा समावेश करण्यात आला आहे. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेनंतर वारंवार दुखापतीमुळे राणी रामपालला बराच कालावधी हॉकी क्षेत्रापासून अलिप्त रहावे लागले होते. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत चौथे स्थान मिळविणाऱया भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व राणी रामपालने केले होते. हॉलंडविरूद्धच्या सामन्यासाठी तिचे संघात पुनरागमन झाले आहे. गोलरक्षक सविताकडे कर्णधारपद कायम ठेवण्यात आले असून दीप ग्रेस एक्काकडे उपकर्णधारपद राहील. सध्या दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या कनिष्ठ महिलांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय कनिष्ठ महिला संघामध्ये सलिमा टेटे, शर्मिलादेवी आणि लालरेमसियामी यांचा समावेश असल्याने हे खेळाडू प्रो लीग हॉकी स्पर्धेतील सामन्यांसाठी उपलब्ध झालेले नाहीत. भारतीय महिला हॉकी संघाला जेनेकी स्कोपमन हे प्रमुख प्रशिक्षक म्हणून लाभत आहेत. प्रो लीग महिलांच्या हॉकी स्पर्धेच्या गुणतक्त्यात भारत सहा सामन्यातून 12 गुणांसह चौथ्या स्थानावर असून हॉलंड 6 सामन्यांतून 17 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.
भारतीय महिला संघ- गोलरक्षक-सविता (कर्णधार), इ.रजनी, बचावफळी-दीप ग्रेस एक्का (उपकर्णधार), गुरजीत कौर, निकी प्रधान,. उदिता, रश्मीता मिंझ, टी. सुमनदेवी, मध्यफळी- निशा, सुशिला चानू, ज्योती, नवज्योत कौर, मोनिका, नमिता टोप्पो, सोनिका, नेहा, महिमा चौधरी, आघाडी फळी- ऐश्वर्या चौहान, नवनीत कौर, रजविंदर कौर, राणी रामपाल आणि मारियाना कुजुर.