- राणें विरोधात महाड मध्ये गुन्हा दाखल तर चिपळून मध्ये दाखल होण्याची प्रक्रिया सुरु
- आणखीन अन्य ठिकाणहून राणें विरोधात तक्रार दाखल होण्याची शक्यता
- चिपळूनात तणावपूर्ण वातावरण – दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमने-सामने
- नियोजित कार्यक्रम आटोपून राणे संगमेश्वर-रत्नागिरीच्या दिशेने रवाना
- सिंधुदुर्गातून अनेक राणे समर्थ रत्नागिरीला रवाना
- बाहेरील समर्थकांना रोखण्यासाठी लांजा राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांची फिल्डींग
प्रतिनिधी / चिपळूण
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्या प्रकरणी युवा सेनेच्या सिद्धेश पाटेकर यांनी महाड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानुसार महाड पोलिसात नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आज आणखीन एका तक्रारीनुसार सकाळी चिपळून पोलिसात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. एकंदर सकाळच्या सत्रातील या तणावपूर्ण घडामोडीनंतर राणे समर्थक व शिवसेना कार्यकर्ते समोरासमोर आल्याने वातावरण तणावग्रस्त बनले आहे.
दरम्यान राणे यांच्यावर नाशिक, पुणे येथे गुन्हा दाखल झाल्याच्या बातम्या येत असल्या तरी त्यास अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नाही. मात्र महाड, चिपळून येथे गुन्हा दाखल झाला असला तरी राणेंना तत्काळ अटक होणे कायदेशीर दृष्टय़ा शक्य वाटत नाही. मात्र शांतता व सुव्यवस्थेचे कारण पुढे करुन स्थानिक प्रशासन या जन आशिर्वाद यात्रेला रोक लाऊ शकते असे बोलले जात आहे.
दरम्यान रत्नागिरीत आज नियोजन मंडळांची सभा असल्यामुळे बहुतांशी स्थानिक नेतेमंडळी या मिटिंगमुळे रत्नागिरितच अडकून पडले आहेत. मात्र असं असलं तरी स्थानिक कार्यकर्ते आक्रमक झालेले असताना देखील स्थानिक नेते मात्र सावध पवित्रा घेऊन या घडामोडिंवर नजर ठेऊन आहेत.
गुहागर शहरात देखील या घटनेचे पडसाद उमटले असून येथील नाक्यावर राणे यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले आहे. चिपळून-बहाद्दुरशेख नाका येथे राणेंच्या विरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तर राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी त्यास जोरदार प्रत्यूत्तर दिले. एकंदर चिपळून मध्ये वातावरण काहीसे तणावपूर्ण बनले असून पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याने दोन्ही बाजूचे कार्यकर्ते काहीसे मवाळ भूमिकेत गेलेले दिसत आहेत.
महाड येथील मुख्यमंत्र्यांविरुद्धच्या कालच्या वक्तव्यानंतर शिवसैनिकांनी राणेंची जनआशिर्वाद यात्रा रोखण्याचा निर्धार केला असला तरी राणेंनी चिपळून मधील आपले नियोजित कार्यक्रम आटोपून संगमेश्वरच्या दिशेने प्रस्तान केले. चिपळून येथील मराठा समाजातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शिवसैनिकांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला असताना काहीसे वातावरण तणावपूर्ण बनले. परंतू पोलिसांनी परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळल्यानंतर कार्यक्रम पूर्ण करुनच राणे पुढील दौऱयाला रवाना झाले.
दरम्यान राणे यांच्या विरोधात रत्नागिरीत शिवसैनिक आक्रमक झाल्याचे वृत्त समजताच सिंधुदुर्गातून शेकडो राणे समर्थक राणेंच्या समर्थनासाठी रत्नागिरीला रवाना झाल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे. तर बाहेरील कार्यकर्त्यांमुळे शहरातील वातावरण बिघडूनये म्हणून स्थानिक पोलिसांनी लांजा राष्ट्रीय महामार्गावर कडक नाकाबंदी केल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे.