आम आदमी पक्षाचा आरोप : ऍड. गणपत गावकर यांचा आपमध्ये प्रवेश
प्रतिनिधी /पणजी
भाजपा कार्यकर्ते तसेच सत्तरीतील झेडपी उमेदवार ऍड. गणपत गावकर यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत आम आदमी पक्षात प्रवेश केला. पक्षाचे राज्य संयोजक राहुल म्हांबरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
गेल्या 20 वर्षांपासून वकिली पेशात असलेले गावकर हे सुमारे 15 वर्षे भाजपचे कार्यकर्ते तसेच उत्तर गोवा जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य होते. गतवर्षी झालेली जिल्हा पंचायत निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून लढविली होती. सत्तरीतील जमीन हक्काच्या मुद्यांवर त्यांनी सतत आवाज उठवला आहे. त्यासंबंधीच्या अनेक चळवळींतही त्यांनी सहभाग घेतला आहे. सालेली ग्रामस्थांचा लढा तसेच नुकत्याच झालेल्या मेळावली आंदोलनांतही ते सहभागी झाले होते. 2014 पासून ते सत्तरी तालुका शेतकरी सहकारी संस्थेचे संचालक आहेत
त्यावेळी बोलताना त्यांनी राणे पिता-पुत्र जोडीने सत्तरीला नेहमीच दुर्लक्षित ठेवले. विद्यमान आमदार प्रतापसिंह राणे आणि विश्वजित राणे हे दोघेही सत्तरीच्या जनतेला सदैव मूर्ख बनवत आहेत. गत 15 वर्षात सत्तरीमध्ये विकासाचा एकही प्रकल्प झाला नाही. त्यामुळे परिस्थिती बिघडली आहे. अनेक कुटुंबे दारिद्र्य रेषेखाली जगत आहेत. अशा गरीबांच्या मदतीसाठी धावणाऱयांना राणे जोडी आक्षेप घेतात व गप्प बसवतात, असा दावा गावकर यांनी केला. म्हणुनच त्यांची हुकूमशाही संपवायची आहे व त्यासाठी आप हा योग्य पर्याय आहे, असेही गावकर म्हणाले
दरम्यान, गांवकर यांच्या पक्षप्रवेशामुळे आप अधिक बळकट झाला आहे. अधिकाधिक लोक आज आपमध्ये सामील होत आहेत. त्यामागील कारण म्हणजे, केवळ आपच गोव्याचे राजकारण बदलू शकतो व तरुणांच्या आशा पूर्ण करू शकतो याबद्दल त्यांची खात्री पटली आहे, असे म्हांब्रे म्हणाले. पत्रकार परिषदेस महादेव नाईक व वाल्मिकी नाईक यांचीही उपस्थिती होती.