महिला टी-20 चॅलेंज फायनल : सुपरनोव्हाजवर एकतर्फी मात, स्मृतीचे अर्धशतक
शारजाह :
फिरकी गोलंदाज राधा यादवने अवघ्या 16 धावांमध्येच 5 फलंदाज गारद केल्यानंतर देखील सुपरनोव्हाज संघाला महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभव स्वीकारावा लागला. ट्रेलब्लेझर्स संघाने 20 षटकात 8 बाद 118 धावा जमवल्या तर प्रत्युत्तरात सुपरनोव्हाजला 7 बाद 102 धावांवर समाधान मानावे लागले.
. ट्रेलब्लेझर्सतर्फे कर्णधार स्मृती मानधनाने 49 चेंडूत 5 चौकार व 3 षटकारांसह 68 धावांची आतषबाजी केली. तिच्याशिवाय डॉटिन (20) व रिचा घोष (10) या दोघींनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली आणि यामुळे ट्रेलब्लेझर्सच्या प्रयत्नांवर बऱयाच मर्यादा राहिल्या. तरीही हा संघ सुदैवाने विजय संपादन करण्यात यशस्वी ठरला.
गोलंदाजीच्या आघाडीवर, निम्मा संघ गारद करणाऱया राधा यादवला अन्य सहकारी गोलंदाजांची समयोचित साथ लाभली. पूनम यादव व सिरिवर्दने यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
संक्षिप्त धावफलक
ट्रेलब्लेझर्स : 20 षटकात 8 बाद 118 (स्मृती मानधना 49 चेंडूत 5 चौकार, 3 षटकारांसह 68, डॉटिन 20, रिचा घोष 10. सुपरनोव्हाजतर्फे राधा यादव 4 षटकात 5-16, पूनम यादव 1-23, सिरिवर्दने 1-22). सुपरनोव्हाज : 20 षटकात 7 बाद 102 (हरमनप्रीत 36 चेंडूत 30. सलमा खातून 3-18).