प्रतिनिधी / सरवडे
शेतीकामात मोलाची साथ देणाऱ्या बैलांचे पूजन करून राधानगरी तालुक्यात बेंदूर सण पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. शेतकर्यांच्या बैलासह घरोघरी मातीच्या बैलांचे पूजन करण्यात आले. यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने गावागावात होणाऱ्या करी तोडण्याच्या बैलांच्या स्पर्धा रद्द करण्यात आल्या.
जिल्ह्यात कर्नाटकी व महाराष्ट्रीय असे दोन बेंदूर साजरे होतात. त्यापैकी महाराष्ट्रीय (कोकणा) बेंदूर राधानगरी तालुक्यातील बहुतांश गावात साजरा केला जातो. आज या सणानिमित्त शेतकऱ्यांनी बैलांना धुऊन शिंगे रंगवून सजवले होते. आज त्यांना गोडधोड खाऊ घालून मनोभावे पुजन केले. घरोघरी कुंभारांनी दिलेल्या मातीच्या बैलांची पूजा करण्यात आली, पुरणपोळ्या, चकल्या, करंज्या आदी फराळाचे पदार्थ घरोघरी बनवण्यात आले होते. घरांच्या प्रवेशद्वारावर पिंपळ पानांचे तोरण बांधण्यात आले होते. दरवर्षी पाहुण्यांना फराळ वाटप करण्याबरोबर जेवणासाठी निमंत्रित केले जाते तसेच बैलांच्या करी तोडण्याच्या स्पर्धा घेतल्या जातात मात्र यावर्षी कोरोनामुळे या गोष्टींना फाटा देण्यात आला.