भोगावती नदी पात्रात पाण्याची वाढ
प्रतिनीधी / कोल्हापूर
राधानगरी धरणाच्या इमर्जन्सी गेटला 29 डिसेंबर रोजी सकाळी दरवाज्याचे तांत्रिक काम करत असताना दरवाजा उघडून अडकला आहे. तांत्रिक बिघाड झाल्याने धरणाचे इमर्जन्सी गेट तब्बल 18 फुट खुले झाले आहे, त्यामुळे भोगावती नदी पात्रात वेगाने पाणी पातळी वाढली आहे. तरी प्रशासनाच्यावतीने सावधानतेचा इशारा दिला आहे.
यामुळे पंचगंगेसह अनेक नद्यांच्या पाणी पातळीत दिवसभरात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. याचबरोबर तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी पाटबंधारे खात्याची यंत्रणा जोरात कामाला लागली असल्याची माहिती समोर आली आहे. तरी नदी काठावर असणारी अनेक गावातील पुरुष, महिला नदीवर जनावरे, कपडे धुण्याच्या निमीत्ताने जात असतात. या जाणाऱ्या व्यक्तींनी आज नदीकडे जाण्याचे टाळणे आवश्यक आहे. या दुरुस्तीसाठी अनेक पथके तातडीने धरण क्षेत्राकडे रवाना झाली आहेत. तसेच घटनास्थळी पोलीस ही दाखल झाले आहेत.