प्रतिनिधी / राधानगरी :
राधानगरी पंचायत समिती उपसभापतीपदी काँग्रेसच्या श्रीमती वनिता भरत पाटील यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीमुळे त्या कसबा वाळवे गावच्या पहिल्या महिला उपसभापती ठरल्या आहेत. पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.
राधानगरी पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना महाआघाडीची सत्ता आहे. आघाडीचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हिंदुराव चौगले, ज्येष्ठ नेते कृष्णराव किरुळकर, अशोकराव फराकटे, अरुण जाधव यांच्या समझोत्यानुसार सभापती, उपसभापतीपद सर्वाना रोटेशन पद्धतीने देण्याचे ठरले होते. त्यानुसार माजी उपसभापती मोहन पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त होते.
आज झालेल्या निवडीदरम्यान श्रीमती पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने पीठासन अधिकारी तथा तहसीलदार मीना निंबाळकर यांनी पाटील यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केलं. निवडीनंतर उपसभापती पाटील यांचा सत्कार निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी सभापती वंदना हळदे, प्रभारी गटविकास अधिकारी शरद शिंदे, वैभव तहसीलदार, प्रभाकर पाटील, दत्तात्रय पाटील, जयवंत पाटील, किरण पाटील, आर. के. मोरे, मानसिंग पाटील यांच्यासह पंचायत समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.