प्रतिनिधी / राधानगरी
राधानगरी येथील कृषी चिकित्सालयाच्या फलरोप भांगलणीचे काम करणाऱ्या महिलांवर झुडपात लपलेल्या गव्याने हल्ला केला. या हल्ल्यात फेजीवडे पैकी लोंढेवाडी येथील महिला केराबाई लक्ष्मण पोकम वय ४५ ही गंभीर जखमी झाली.
राधानगरी येथील हत्तीमहाल परिसरात महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या कार्यालयाजवळ कृषी चिकित्सालय आहे. या चिकित्सालयात आंबा, काजू,पेरू, नारळ आदींसह विविध फळझाडांच्या रोपांची लागवड केली जाते, इथं फळ बागाही आहेत, कृषी चिकित्सालयाच्या या प्रकल्पात मजूरीवर काम करणाऱ्या चार महिला गुरुवारी सकाळी भांगलनीची कामे करत असताना झुडपात असणाऱ्या गव्याने अचानक हल्ला चढवला या हल्ल्यात केराबाई लक्ष्मण पोकम या महिलेच्या बरगडीवर, दंडाला आणि छातीवर गंभीर मार लागला आहे.
जखमी अवस्थेत तिला सोळांकुर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केली होती. परंतु गंभीर जखमी असल्याने तिला कोल्हापूर येथील दवाखान्यात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. गव्याने जखमी केलेल्या महिलेला वन्यजीव विभागाने तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे. घटनेनंतर वनक्षेत्रपाल नवनाथ कांबळे, वन्यजीव विभागाचे वनपाल संजय कांबळे, अमित कटके, सूर्यकांत गुरव,अनिल चांदम यांनी भेट दिली.या घटनेची नोंद राधानगरी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.