राधानगरी / प्रतिनिधी
राधानगरी ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर सुरू केल्यापासून इतर रुग्णांवरील उपचार बंद होते. त्यामुळे सामान्य रुग्णांची गैरसोय होत होती,पर्यायी व्यवस्था सुरू करून बाह्य रुग्ण सेवा सुरू करावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या सविता भाटळे आणि आजरा बँक संचालक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सरचिटणीस राजेंद्र भाटळे यांनी केली होती. फेब्रुवारी पासून या कोविड रुग्णावर उपचार सुरू करण्यात आले होते. परिणामी ग्रामीण रुग्णालयात बाह्यसेवा बंद करण्यात आली होती त्यामुळे इतर रुग्णाची गैरसोय होत होती, आज ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने कन्या शाळा इमारतीत बाह्य रुग्ण उपचार सेवा सुरू केल्याने परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
आज कन्या शाळेच्या इमारतीमध्ये ग्रामीण रुग्णालयाची बाह्य रुग्ण सेवा सुरू करण्यात आली. ग्रामीण रुग्णालय बाह्य रुग्ण सेवा कक्षाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्या सविता भाटळे,प्राध्यापिका ऐश्वर्या पालकर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी राजेंद्र भाटळे, शिवसेना तालुकाप्रमुख उत्तम पाटील,मनसे तालुकाध्यक्ष राजेंद्र चव्हाण,बाळासाहेब कळमकर, ग्रामपंचायत सदस्य संतोष टेपुगड, शत्रुघ्न सांगावकर, डॉ. गणपती गवळी, आरोग्य विभागाचे आर.एस. पाटील, प्रवीण तिरवडे ,संजय गोजारे,बबन पालकर , मंगेश राऊत आदी उपस्थित होते.