प्रतिनिधी/ सातारा
राधिका रोडचे काम अतिशय चांगल्या दर्जाचे होत आहे. या कामांची पाहणी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी स्वतः केली होती. ठेकेदार स्वतः हे काम उभे राहून करुन घेत आहेत. कामाचा दर्जा अतिशय चांगला आहे, असे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनीही सांगितले. या कामाला वेग आला असून शनिवारी हे काम सारस्वत बँक, कदम पेट्रोल पंप ते मार्केट यार्डपर्यंत सुरु होते. त्या कामाकरीता रस्त्यावरची वाहतूक वळवण्यात आली होती.
शहरात महत्वाचा रस्ता म्हणून राधिका रोडकडेही पाहिले जाते. याच रस्त्याचे काम पालिकेच्या बांधकाम विभागाकडून सध्या सुरु आहे.हे काम अतिशय चांगल्या दर्जाचे होत असल्याबाबत स्वतः उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी पाहणी करुन कौतुक केले होते. राधिका चित्रपटगृहाच्या चौकापासून सुरु झालेले काम टप्याटप्याने करण्यात येत आहे. बुधवारनाक्याच्या रस्त्यापासून पुढे तालुका पोलीस ठाण्यापर्यंत खडीकरणाचा थर टाकून त्यामध्ये डांबराचे मिश्रण टाकून वरुन बारीक चुऱयाचा थर टाकण्यात आला आहे. पुढे शनिवारी हे काम स्वतः ठेकेदार उभे राहून कदम पेट्रोल पंप ते बाजार समितीच्या व्यापारी गाळयापर्यंत सुरु होते. त्यामुळे वाहतूक त्या रस्त्यावरची बंद करण्यात आली होती. वाहनधारक अन्य रस्त्यांनी जात होते.