प्रतिनिधी/ महाबळेश्वर
महाबळेश्वर प्रतापगड मुख्य रस्त्यावर असलेल्या मेटतळे गावाच्या हद्दीत एका वळणावर प्रतापगडच्या दिशेने जात असलेल्या धुळे येथील पर्यटकाच्या वाहनावर जंगलातून अचानक आलेल्या एका रानगव्याने रस्ता ओलांडताना उडी मारल्याने वाहनाच्या चालकाच्या बाजूची काच फुटली. या रानगव्याची केस व रक्त या गाडीच्या काचेवर उडाले. तशाच अवस्थेत या गव्याने रस्ता ओलांडून धूम ठोकली.
धुळे येथील हे पर्यटक आपल्या कुटुंबियांसह महाबळेश्वर पर्यटनास आले होते. प्रतापगडच्या दिशेने हे कुटुंब निघाले असता ही घटना घडली. या घटनेने हे पर्यटक कुटुंब मात्र चांगलेच घाबरले होते. सुदैवानी कुणालाही दुखापत झाली नसली तरी वाहनाचे मात्र नुकसान झाले.