मासे कमी अन् जेलिफिशच जास्त
जेलिफिशनी पर्यटकांनाही मारला डंख
मालवण:
दांडी येथील एका रापण संघाला रविवारी सकाळी मिळालेल्या बंपर जेलिफिशमुळे अक्षरश: कंबरडे मोडायची वेळ मच्छीमारांवर आली होती. जेलिफिशच्या या झुंडीत एका महाकाय जेलिफिशचे दर्शन मच्छीमारांना झाले. गेल्या चार-पाच वर्षांत महाकाय जेलिफिश जाळ्य़ात येण्याचे प्रमाण वाढले आहे. सागरी अभ्यासकांच्या मते समुद्रात माणसाच्या आकाराएवढे जेलिफिश असतात.
मासेमारी व्यवसायासमोर जेलिफिशचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. मासे कमी आणि जेलिफिशच जास्त अशी सद्यस्थिती आहे. दांडी समुद्र किनारी रविवारी सकाळी एका रापणीला हजारोंच्या संख्येने जेलिफिश सापडले. त्यामुळे मच्छीमार अक्षरश: हैराण झाले. मोठय़ा प्रमाणातील जेलिफिशमध्ये दबले गेलेले मासे वेगळे करताना मच्छीमारांची पुरती दमछाक झाली. शंभरेक जेलिफिश बाजूला सारल्यावर त्यातून एक मासा मिळत होता, अशी बिकट परिस्थिती होती. जेलिफिशचा डंख लागल्यामुळे होणाऱया वेदनासुद्धा त्यांना सहन कराव्या लागत होत्या. तरीही मच्छीमारांनी मासे वेचून झाल्यावर जेलिफिश किनाऱयावरच न टाकता त्यांची योग्यप्रकारे विल्हेवाट लावत समुद्रकिनारा स्वच्छ केला. जेलिफिशला स्थानिक मच्छीमार ‘झार’ असे संबोधतात.
पुन्हा एकदा महाकाय जेलिफिश
दोन वर्षांनी पुन्हा एकदा मालवणात महाकाय जेलिफिशचे दर्शन मच्छीमारांना झाले. थंडीत जेलिफिशना किनाऱयालगत पोषक वातावरण तयार होते. त्यामुळे जेलिफिश मोठय़ा प्रमाणात किनाऱयावर स्थलंतरीत होतात आणि रापणीच्या जाळ्य़ात सापडतात. सागरी अभ्यासक जेलिफिशची वाढती संख्या मत्स्य दुष्काळाचे द्योतक मानतात. सागरी जैव साखळी कुठे तरी बिघडल्यानेच जेलिफिशची संख्या वाढली असल्याचे सागरी अभ्यासकांचे मत आहे. जेलिफिशला खाणारे समुद्री कासवांसारखे सागरी जीव कमी झाल्यामुळे जेलिफिश वाढले असावेत, अशी शक्यताही वर्तविली जात आहे.
पर्यटकांना मारला डंख
जेलिफिशचा किनाऱयालगतचा संचार मच्छीमारांना त्रासदायक बनला. त्यामुळे समुद्र स्नानासाठी जाणाऱया पर्यटकांनाही खूप सावधगिरी बाळगावी लागतेय. तरीही काही पर्यटकांना जेलिफिशनी डंख मारल्याच्या घटना घडल्या आहेत. यात पर्यटकांचा हात अक्षरश: लाल झाला होता. अखेर वेदनांचा दाह कमी करण्यासाठी व्हेनेगर आणि गरम पाण्याचा मारा करून वेदनांवर मात करण्यात आली.