फ्रान्सहून 5 विमाने घेऊन येताहेत 7 भारतीय चालक, दुबईत घेणार एक थांबा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गेली पंधरा वर्षे गाजत असलेल्या राफेल विमानांची प्रथम तुकडी येत्या 36 तासांमध्ये भारतात येत आहे. या तुकडीत 5 विमाने असतील. या तुकडीने फ्रान्सहून उड्डाण केले आहे. ही विमाने भारतात आणण्याचे उत्तरदायित्व 7 चालकांवर सोपविण्यात आले आहे. या तुकडीसोबत फ्रान्सची 2 विमानेही आहेत.
7 हजार किलोमीटर अंतर कापून ही विमाने बुधवारी सकाळी भारतात अवतीर्ण होतील. त्यानंतर त्वरित त्यांची नियुक्ती भारत-चीन सीमेवर केली जाणार आहे. त्यापूर्वी ही विमाने हरियाणातील अंबाला येथील वायुदलाच्या विमानतळावर उतरणार आहेत. या विमानांमुळे भारताच्या वायुदल सामर्थ्यात मोठी भर पडणार आहे. अशी 36 विमाने विकत घेण्याचा करार भारताने फ्रान्सशी केला आहे.
दीड दशकांची प्रतीक्षा संपणार
1999 मध्ये कारगिल संघर्ष उद्भवल्यानंतर भारताला अत्याधुनिक युद्ध विमानांची आवश्यकता प्रकर्षाने भासू लागली होती. त्यामुळे तत्कालीन वाजपेयी सरकारने अशा विमानांचा शोध सुरू केला. 2002 मध्ये फ्रान्सच्या दासाँ कंपनीकडून ही विमाने घेण्याचे तत्वतः निश्चित झाले. तथापि, 2004 मध्ये काँगेसप्रणित सरकार निवडून आल्यानंतर मात्र विमाने विकत घेण्याची प्रक्रिया थंडावली. त्या दहा वर्षांमध्ये केवळ या विमानांची चर्चाच होत राहिली. मात्र, एकही विमान भारतात अवतरले नाही. 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेत्वृत्वात भाजप-रालोआचे पूर्ण बहुमताचे सरकार स्थानापन्न झाल्यानंतर या व्यवहाराला खरी गती आली. त्यानंतर आता ही विमाने भारतात प्रत्यक्षपणे येत आहेत.
दुबईत थांबा घेणार
दुबई येथे फ्रान्सचा वायुतळ आहे. तेथे ही विमाने एक थांबा घेणार आहेत. या तळावर विमानांची पूर्ण तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर बुधवारी सकाळी किंवा दुपारपर्यंत ती भारतात येतील. भारतात आल्यानंतरही विमानांची पुन्हा सखोल तपासणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
राफेल आणि सुखोई
भारताने यापूर्वीच रशियाकडून अत्याधुनिक सुखोई (एसयु-30 एमकेआय) ही युद्ध विमाने घेतलेली आहेत. आता राफेल विमानांना या विमानांची जोड मिळणार आहे. राफेल आणि सुखोई ही जोडगोळी भारताच्या शत्रूंचा थरकाप उडविणारी आहे, असे मत अनेक संरक्षण तज्ञांनी व्यक्त केले. ज्यावेळी ही दोन्ही विमाने एकत्रितरित्या आपले कार्य सुरू करतील तेव्हा भारताची वायुयुद्ध क्षमता प्रचंड वाढलेली असेल, असे उद्गार वायुदल प्रमुख आर. के. एस. भदौरिया यांनी काढले. दोन्ही विमाने चौथ्या पिढीतील मानली जातात.
‘राष्ट्रभक्तीला राष्ट्रशक्तीची जोड आवश्यक’
आपल्या देशात संरक्षणसामग्रीच्या विषयावरूनही राजकारण केले जाते ही दुर्दैवाची बाब आहे. राफेल विमान व्यवहाराला या राजकारणाची झळ पोहचल्याने वायुदल आणि आपल्या सामरिक सामर्थ्यावर विपरीत परिणाम झाला. विरोधी पक्षांनी या व्यवहारात भ्रष्टाचार असल्याचा धादांत खोटा आरोप केला. तसेच विमानांच्या क्षमतेसंबंधीची माहिती व किंमत उघड करण्याचा आग्रह धरला. कोणताही देश आपल्या शस्त्र आणि साधनसामग्रीचे खरे स्वरूप कधीच उघड करीत नाही. कारण त्यामुळे शत्रू सावध होऊन आपल्यापेक्षाही अधिक तयारी करण्याची शक्यता असते. त्यामुळे केवळ राजकारण साधता यावे आणि सरकार भ्रष्टाचारी आहे अशी लोकांची समजूत व्हावी, यासाठी विरोधकांनी केलेले प्रयत्न अश्लाघ्य होते. मात्र आता ही विमाने येत आहेत, ही आनंदाची आणि समाधानाच बाब आहे, अशी उत्कट प्रतिक्रिया लेफ्टनंट जनरल (निवृत्त) आणि प्रसिद्ध संरक्षणतज्ञ डी. बी. शेकटकर यांनी व्यक्त केली आहे.
दशकानुदशके आपल्याकडे शस्त्रशक्ती वाढविण्याविषयी केवळ तोंडदेखली आश्वासने दिली गेली. पण प्रत्यक्ष काम फार कमी झाले आहे. निर्णय घेण्यातील विलंब आणि घेतलेल्या निर्णयांसंबंधी होणारे राजकारण यावर आपले शत्रू बारकाईने दृष्ठी ठेवून असतात. संरक्षण सामग्रीसंबंधीचे देशांतर्गत विवाद त्यांच्याच पथ्यावर पडतात. सरकारी अधिकारी, विविध विदेशी कंपन्यांचे दलाल आणि राजकीय नेते यांची एक अभद्र युतीही अनेकदा कार्यरत असते. ती नेहमी प्रामाणिकपणे घेतलेल्या निर्णयांमध्ये अडथळे आणते. कारण त्यांचे आर्थिक आणि हितसंबंध दुखावले जातात. याचाही लाभ अखेर शत्रूलाच होतो. त्यामुळे अशा बाबींना प्रसारभाध्यमांनीही प्रसिद्धी देऊ नये, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले.
राफेल विमान हे ‘बहुउद्देशीय’ (मल्टीरोल) आहे. ते शत्रूची विमाने पाडू शकते, शत्रूच्या भूमीवरील लक्ष्यांचा भेद करू शकते, तसेच त्यावरील क्षेपणास्त्रांचा पल्ला अधिक असल्याने आपल्या वायुक्षेत्रात राहूनच आपण शत्रूच्या क्षेत्रातील लक्ष्यांचा भेद करू शकतो. हे एक विमान पाच युद्धविमानांचे कार्य करते. अशा विमानांची भारताला नितांत आवश्यकता होती. सर्व विमाने जेव्हा येतील तेव्हा भारताच्या वायुदलाचे सामर्थ निश्चितच अनेक पटींनी वाढेल, असे प्रतिपादन त्यांनी केले.
आक्रमक, भेदक, मारक…
ड राफेलचा वेग 1.6 मॅकहून (2100 किमीहून) अधिक
ड राफेलची उंची गाठण्याची क्षमता 45 सहस्त्र फूटापेक्षा जास्त
ड एका उड्डाणात प्रवासाचा पल्ला 3,500 कि. मी. हून अधिक
ड राफेल विमानाची एकंदर लांबी 15 मीटरहून अधिक
ड राफेलच्या पंखांचा एकंदर विस्तार 10 मीटरहून अधिक
ड वायुमंडलात असतानाच राफेलमध्ये इंधन भरण्याची क्षमता