वृत्तसंस्था/ लेह
लडाखमध्ये राफेल लढाऊ विमानाच्या गर्जनेमुळे बिथरलेला चीन आता तिबेटची राजधानी ल्हासामध्ये भारतीय वायुदलाच्या हल्ल्यापासून बचावाच्या तयारीला लागला आहे. चीनने ल्हासामध्ये हवाईहल्ल्यापासून बचावाची प्रात्यक्षिकं केली आहेत. या प्रात्यक्षिकांदरम्यान बनावट बॉम्बस्फोटांचा आवाज ऐकू आले आणि सर्वत्र सायरन वाजत राहिले.
हे प्रात्यक्षिक चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीकडून आयोजित करण्यात आले होते. राफेल लढाऊ विमानाच्या लडाखच्या आकाशातील उड्डाणानंतर चीनने स्वतःची युद्धतयारी वाढविण्याच्या हालचाली सुरू केल्याचे मानले जात आहे.
चीनचा युद्धाभ्यास
तत्पूर्वी भारत आणि चीनदरम्यान सुरू असलेल्या तणावादरम्यान पीपल्स लिबरेशन आर्मीने रात्रीच्या वेळी हल्ला करण्याचा युद्धाभ्यास केला होता. या युद्धाभ्यासात चिनी तोफांनी मारा केला, तर जमिनीवरून हवेत मारा करणाऱया क्षेपणास्त्रांचीही चाचणी करण्यात आली.
राफेल प्रभावी अस्त्र
भारताचे सर्वात आधुनिक लढाऊ विमान राफेल लडाखच्या आकाशात गर्जत असताना चीनने हा युद्धाभ्यास केला आहे. राफेलच्या वैमानिकांनी अंबालापासून लडाखपर्यंत विमानांचे उड्डाण केले आहे. राफेलच्या वैमानिकाला लडाखमधील हवामान आणि वातावरणाची ओळख व्हावी म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. चीनविरोधात राफेलची गरज भासल्यास त्याचे वैमानिक वातावरणाशी परिचित असावेत अशी यामागची भूमिका आहे.
मिराजचीही उड्डाणे
सीमेवर काही मिराज लढाऊ विमानेही उड्डाण करताना दिसून आली आहेत. वायुदलाने 10 सप्टेंबर रोजी अंबाला वायुतळावर राफेल विमानांचा ताफ्यात समावेश केला होता. मिडएअर रिफ्युलिंगशिवाय राफेलची भरारी 780 ते 1650 किलोमीटरपर्यंत असते. 300 किलोमीटरपेक्षा अधिक पल्ल्याची ‘स्कॅल्प एअर-टू-ग्राउंड क्रूझ क्षेपणास्त्रांनी सज्ज करण्यात आले आहे.