नियतकालिकाच्या नव्या पर्दाफाशमुळे भाजप-काँगेसमध्ये शब्दयुद्ध
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
बराच काळ गाजलेल्या राफेल युद्धविमान भ्रष्टाचार प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळाले आहे. फ्रान्समधील मिडियापार्ट या नियतकालिकाने या संबंधी नवा पर्दाफाश केला आहे. राफेल विमाने निर्माण करणाऱया डेसॉल्ट या कंपनीने सुषेण गुप्ता याच्या ‘इंटरस्टेलर’ या मॉरिशसमधील मध्यस्थ कंपनीला 2007 ते 2012 या कालावधीत 75 लाख युरो (साधारणतः 56 कोटी रुपये) दिले होते, असे मिडियापार्टने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या वृत्तात स्पष्ट केले होते. या कालावधीत देशात भाजपचे नव्हे तर काँग्रेसचेच राज्य होते.
गुप्ता यांच्या कंपनीने मध्यंतरीच्या काळात काही बनावट पावत्या तयार केल्या होत्या. त्यांचाही पर्दाफाश मिडियापार्टने केला आहे. मॉरिशसच्या ऍटॉर्नी जनरलनी या पावत्या 11 ऑक्टोबर 2018 या दिवशी सीबीआयच्या सुपूर्द केल्या आहेत. यासंबंधीचे मॉरिशसच्या ऍटॉर्नी जनरलचे सीबीआयला पाठविलेले पत्रही या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले आहे. त्यातून ही पैशाची देवाण घेवाण काँगेसप्रणित सरकारच्याच काळात झाली होती हे सिद्ध होते असे प्रतिपादन भाजपने केले आहे.
पुन्हा जोरदार शब्दयुद्ध
मिडियापार्टने हा खुलासा केल्यानंतर भारतात त्याचे जोरदार पडसाद उमटले आहेत. भाजपने काँगेसवर कठोर टीका करताना भ्रष्टाचार काँगेसच्याच काळात झाल्याचे सिद्ध झाल्याचे प्रतिपादन केले आहे. राहुल गांधी यांनी मात्र ट्विट करुन काँगेस कार्यकर्त्यांनी राफेल भ्रष्टाचाराविरोधात संघर्ष सुरुच ठेवावा, असे आवाहन आपल्या काँगेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना नव्याने केले आहे.
गुप्त कागदपत्रे पुरविली
सुषेण गुप्ता याच्या कंपनीने डेसॉल्ट कंपनीला भारताची संरक्षणविषयक गुप्त कागदपत्रे पुरविली होती, असाही खळबळजनक खुलासा मिडियापार्टने केला होता. ही कागदपत्रे संरक्षण साधनांच्या खरेदीसंबंधी जी चर्चा भारतीय अधिकाऱयांमध्ये 2007 ते 2012 या काळात होत होती त्यासंबंधीची आहेत. गुप्ता याच्यावर आगुस्तावेस्टलँड या हेलिकॉप्टर भ्रष्टाचार प्रकरणातही सीबीआयने आरोपपत्र सादर केले आहे. तर डेसॉल्ट कंपनीने भ्रष्टाचाराच्या आरोपाचा इन्कार केला आहे.
आयएनसी म्हणजे ‘आय नीड कमिशन’
काँगेसचे लघुरुप आयएनसी (इंडियन नॅशनल काँगेस) असे आहे. पण आयएनसी याचा अर्थ इंडियन नॅशनल काँगेस असा नसून ‘आय नीड कमिशन) (मला दलाली हवी) असा आहे, हे राफेल प्रकरणातील नव्या पर्दाफाशमुळे सिद्ध झाले आहे, अशी प्रखर आणि बोचरी टीका भाजपचे प्रवक्ते संबीत पात्रा यांनी केली. राफेल विमान खरेदीत काँगेसला आणखी दलाली मिळविण्याचा मोह झाला होता. मध्यस्थांकडून मिळालेल्या दलालीच्या रकमेवर काँग्रेसचे समाधान झाले नव्हते. त्यामुळेच काँगेसच्या काळात राफेल कंपनीशी विमान खरेदी करार होऊ शकला नाही, असाही गंभीर आरोप संबीत पात्रा यांनी पत्रकार परिषदेत केला.