ऑनलाईन टीम / चंदिगढ :
बहुप्रतिक्षित पाच ‘राफेल’ फायटर विमानांची पहिली तुकडी तब्बल 7 हजार किमीचा प्रवास करून आज दुपारी सव्वातीनच्या सुमारास हरियाणातील अंबाला एअरबेसवर दाखल झाली.
फ्रान्समधील मेरिनॅक एअरफोर्सच्या तळावरुन सोमवारी सकाळी या विमानांनी उड्डाण केले होते. संयुक्त अरब अमिरातीच्या अल धफ्रा एअर बेसवर मंगळवारी रात्री या विमानांनी थांबा घेतला. त्यानंतर आज सकाळी 11 वाजता पुन्हा भारतात येण्यासाठी उड्डाण केले होते. भारतीय हद्दीत दाखल होताच त्यांनी भारतीय नौदलाच्या आएनएस कोलकाताशी संपर्क साधला. आयएनएस कोलकाता ही सध्या पश्चिमी अरबी समुद्रात तैनात आहे. त्यानंतर ज्यावेळी राफेलच्या ताफ्याने भारतीय हवाई क्षेत्रात प्रवेश केला. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी दोन सुखोई 30 लढाऊ विमानांनी उड्डाण केले.
राफेलच्या पहिल्या तुकडीत तीन सिंगल सीटर आणि दोन डबल सीटर विमानांचा समावेश आहे. फ्रान्समध्ये प्रशिक्षित करण्यात आलेले भारतीय वैमानिक ही विमाने घेऊन भारतात आले. या विमानांच्या हाताळणीसाठी IAF चे बारा वैमानिक आणि इंजिनिअरींग क्रूला पूर्णपणे प्रशिक्षित करण्यात आले आहे. वीस ऑगस्टला पारंपरिक पद्धतीने सोहळा आयोजित करुन या फायटर विमानांचा भारतीय हवाई दलात समावेश करण्यात येणार आहे.