ऑनलाईन टीम / चंदीगढ :
भारतात दाखल झालेली राफेल लढाऊ विमानं उद्या (दि.10) हवाई दलात सामील होणार आहेत. यासाठी अंबाला एअरबेसजवळ विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, फ्रान्सचे संरक्षण मंत्री फ्लॉरेन्स पार्ली यांच्यासह सैन्य दलातील वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
29 जुलै रोजी फ्रान्स बनावटीच्या 5 राफेल लढाऊ विमानांची पहिली तुकडी हरियाणातील अंबाला एअरबेसवर दाखल झाली. राफेलच्या पहिल्या तुकडीत तीन सिंगल सीटर आणि दोन डबल सीटर विमानांचा समावेश आहे. फ्रान्समध्ये प्रशिक्षित करण्यात आलेले भारतीय वैमानिक ही विमानं घेऊन भारतात आले. या विमानांच्या हाताळणीसाठी IAF चे बारा वैमानिक आणि इंजिनिअरींग क्रूला पूर्णपणे प्रशिक्षित करण्यात आले आहे.
भारतात येण्यासाठी फ्रान्समधील मेरिनॅक एअरफोर्सच्या तळावरुन या विमानांनी उड्डाण केले होते. संयुक्त अरब अमिरातीच्या अल धफ्रा एअर बेसवर एक दिवस थांबा घेऊन दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांनी भारताच्या दिशेने उड्डाण केले होते. तब्बल 7 हजार किमीचा टप्पा पूर्ण करून ही विमाने 29 जुलैला दुपारी सव्वातीनच्या सुमारास अंबाला एअरबेसवर दाखल झाली होती. 20 ऑगस्टला पारंपरिक पद्धतीने सोहळा आयोजित करुन या फायटर विमानांचा भारतीय हवाई दलात समावेश करण्यात येणार होता. मात्र, काही कारणास्तव तो सोहळा उद्या आयोजित करण्यात आला आहे.