‘मॅडम चीफ मिनिस्टर’नंतर चित्रपटनिर्माते सुभाष कपूर आता ‘महारानी’ वेबसीरिज घेऊन येत आहेत. सुभाष यांची ही वेबसीरिज त्यांच्या अन्य चित्रपटांप्रमाणेच राजकीय विषयांवर आधारित आहे. ‘मॅडम चीफ मिनिस्टर’ हा त्यांचा चित्रपट मायावती यांच्या जीवनावर बेतलेला असल्याचा आरोप होत आहे. तर ‘महारानी’ वेबसीरिज राबडी देवी यांच्या जीवनाशी संबंधित असल्याचे समजते. ‘महारानी’ या वेबसीरिजमध्ये हुमा कुरैशी या अभिनेत्रीने बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांच्यासारखी व्यक्तिरेखा साकारली आहे.
हा राबडीदेवी यांचा जीवनपट नसला तरीही सार्वजनिक पातळीवर उपलब्ध घडामोडींना नाटय़मय रंग देण्यात आला आहे. सत्ता केवळ उच्चशिक्षित लोकच चालवू शकत नाही, कमी शिकलेले लोकही सत्तेची खुर्ची कौशल्यपूर्वक हाताळू शकतात हा संदेश यातून अधोरेखित करण्यात येणार आहे. महारानी वेबसीरिजचे चित्रिकरण अलिकडेच मध्यप्रदेशात पूर्ण झाले आहे.