वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली लॉन टेनिस संघटनेच्या ग्रासकोर्टवर शुक्रवारपासून सुरू झालेल्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेतील विश्वगट-1 प्ले ऑफ लढतीत भारताच्या रामकुमार रामनाथनने सलामीचा एकेरी सामना जिंकून आपल्या संघाला डेन्मार्कवर 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.
या लढतीतील सलामीच्या एकेरी सामन्यात रामकुमार रामनाथनने डेन्मार्कच्या ख्रिस्टेन सिगार्डचा 6-3, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. हा एकेरीचा सामना तब्बल एक तास चालला होता. या लढतीत डेन्मार्कच्या ख्रिस्टेनला स्वतःची सर्व्हिस राखताना झगडावे लागले. रामकुमार रामनाथनने अचूक सर्व्हिस आणि बेसलाईन खेळाच्या जोरावर ख्रिस्टेनचा पराभव केला.
पहिल्या सेटमध्ये डेन्मार्कच्या ख्रिस्टेनला केवळ तीन गेम्स तर दुसऱया सेटमध्ये दोन गेम्स जिंकता आले. दिल्ली जिमखान्याच्या ग्रासकोर्टवर तसेच येथील वातावरणाशी जुळवून घेताना ख्रिस्टेनला खूपच अवघड गेल्याचे जाणवले. आता या लढतीतील दुसरा एकेरी सामना भारताचा युकी भांब्री आणि डेन्मार्कचा मायकेल टॉर्पेगार्ड यांच्यात खेळविला जाणार आहे.