ट्रस्टच्या सर्व कागदपत्रांसाठी होणार वापर
वृत्तसंस्था/ अयोध्या
अयोध्येमध्ये राम मंदिर उभारणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने बुधवारी हनुमान जयंतीचे औचित्य साधून लोगोचे अनावरण केले. ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी याबाबत माहिती दिली.
लाल आणि पिवळय़ा रंगसंगतीमध्ये हा लोगो बनवण्यात आला आहे. सूर्यप्रतिमेतून भगवान रामाच्या सूर्यवंशाची आठवण दाखवली आहे. लोगोमध्ये श्रीरामाची लोकांना अभय दर्शवणारी मुद्रा दाखवण्यात आली आहेत. तर अर्धगोलाकार पट्टीमध्ये वरील बाजूस श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र असे नमूद करण्यात आले आहे. त्याच्या दोन्ही बाजुस हनुमानाची वीरमुद्रा आहे. तर आधारपट्टीवर ‘रामो विग्रहवान धर्मः’ असे लिहिण्यात आले आहे, असे राय यांनी सांगितले.
लोकांमध्ये श्रीरामाची प्रतिमा अभय स्वरुपात आहे. तेच रुप या लोगोमध्ये दाखवण्यात आले आहे. यासाठी वाल्मिकी रामायणाचा आधार घेण्यात आला आहे.आता यापुढे रामजन्म भूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्यावतीने याचा वापर सर्व पत्र व्यवहार, लेटर हेड आणि अन्य कागदपत्रांवर केला जाणार आहे, असे चंपत राय यांनी स्पष्ट केले.