माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर
प्रतिनिधी /बेळगाव
रामतीर्थनगर येथील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवज पळविला आहे. मंगळवारी सायंकाळी 5 ते 6.30 या वेळेत ही घटना घडली असून बुधवारी माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
परिवहन मंडळाचे कर्मचारी इराण्णा ईश्वर होसमनी यांच्या घरी हा चोरीचा प्रकार घडला आहे. मंगळवारी सायंकाळी आपल्या घराला कुलूप लावून इराण्णा यांची पत्नी मुलांना टय़ुशनला सोडायला गेली होती. त्यानंतर ब्युटीपार्लरला जाऊन 6.30 वाजता त्या घरी परतल्या त्यावेळी चोरीचा प्रकार उघडकीस आला.
चोरटय़ांनी कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला आहे. तिजोरीतील 1 लाख 38 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने पळविले आहेत. चोरीच्या या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. माळमारुती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून पोलीस उपनिरीक्षक होन्नाप्पा तळवार पुढील तपास करीत आहेत.