@ प्रतिनिधी/ बेळगाव
बुडाने वसविलेल्या कुमारस्वामी लेआऊट आणि रामतीर्थ नगर लेआऊट वसाहत महापालिकेकडे हस्तातंर करण्याच्यादृष्टीने 35 कोटीची विकासकामे राबविण्यात येणार आहे. यापैकी 28 कोटी 98 लाखाची विकासकामे रामतीर्थ नगरमध्ये राबविण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावाला कॅबिनेटमध्ये मंजुरी देण्यात आली असून, विकासकामे राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
रामतीर्थ नगरची वसाहत निर्माण करून वीस वर्षाहून अधिक कालावधी झाला. पण अद्यापही महापालिकेकडे हस्तातंर करण्यात आली नाही. तसेच कुमारस्वामी लेआऊटची हस्तातर प्रक्रिया रखडली आहे. यामुळे रहिवाशांना नागरी सुविधा मिळणे मुष्किल बनले आहे. स्वच्छतेसह विविध समस्यांना सामोर जावे लागत असल्याने महापालिकेकडे हस्तातंर करण्याची मागणी करण्यातआली होती. पण या दोन्ही वसाहतीमधील रस्ते, गटारींची दुरावस्था झाली आहे. सर्व विकासकामे राबविण्यासाठी 86 कोटीचा आराखडा तयार करण्यात आला होता. पण यापैकी काही रस्त्याचा विकास केआयडीबीने केला असून स्मार्टसिटी योजनेअंतर्गत काही विकासकामे राबविण्यात येत आहेत. यामुळे उर्वरीत कामे पुर्ण करून या दोन्ही वसाहती हस्तातंर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याकरिता नव्याने आराखडा तयार करून राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.
रामतीर्थ नगरमधील 17 किलोमीटर अंतराच्या गटारी बांधण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच रस्त्याचा विकास, उद्यानाचा विकास अशी विविध विकासकामे राबविण्यात येणार आहेत. काही मुख्य रस्त्यावर डेकोरेटिव्ह लाईट लावण्याचा प्रस्तावदेखील आहे. सदर विकासकामे राबविण्यासाठी बुडाने 28 कोटी 98 लाख रूपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे आवश्यक असलेल्या रस्त्यांचा विकास व नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला होता. सदर प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी दि. 25 नोव्हेंबर 2019 रोजी पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला कॅबिनेट मंत्रीमंडळात मंजुरी देण्यात आली असून, विकास कामे राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया राबवून विकासकामे पूर्ण झाल्यानंतर रामतीर्थनगर वसाहत महापालिकेकडे हस्तांतर करण्यात येणार आहे.