हुतात्मा चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत निर्णय
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन हुतात्मा चौक येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा रामदेव गल्लीतील श्रीराम मंदिरात श्रीमूर्तीची प्रतिष्ठापना करुन केवळ दीड दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. 73 वर्षे या मंडळाने सातत्याने नाविन्यपूर्ण देखावे व भव्य श्रीमूर्ती प्रतिष्ठापना करुन उत्सव साजरा केला आहे. यंदा मात्र गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय या मंडळाने घेतला असुन इतरांसमोर आदर्श ठेवला आहे.
सदर गणेशोत्सव मंडळाची बैठक ऍड. अशोक पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमिवर उत्सव कसा साजरा करावा याबद्दल विचारविनीमय करण्यात आला. सर्वांनुमते कोरोनाचे संकट लक्षात घेता यावषी हा उत्सव साधेपणाने करावा, भव्य श्रीमूर्ती ऐवजी दोन फुटांची श्रीमूर्तींची प्रतिष्ठापना करावी, सर्व धार्मिक विधींना फाटा न देता, श्रीमूर्तींचे आगमन आणि विसर्जन या दोन्ही मिरवणुकींना फाटा द्यावा आणि यंदा सार्वजनिक मंडळाऐवजी रामदेव गल्लीतील श्रीराम मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठापना करावा, असे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
याचबरोबर यंदा वर्गणी गोळा न करता भक्तांनी स्वेच्छेने दिलेल्या देणगीचा स्वीकार केला जाणार आहे. विद्युत रोषणाईमध्ये सुध्दा कपात करण्यात येणार आहे. तसेच जर कोरोना नियंत्रणात आल्यास आरोग्य शिबिरासह अन्य समाजोपयोगी उपक्रम राबविल्याचे ठरले. सदर गणेशोत्सव मंडळाची 1947 साली स्थापना झाली. हुतात्मा चौक, किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली व कडोलकर गल्ली येथील व्यापारी मंडळींनी एकत्र येवून हे मंडळ स्थापन केले होते. 1997 साली मंडळाने सुवर्ण महोत्सव साजरा केला. दरवषी हे मंडळ उत्सवादरम्यान अनेक उपक्रम राबविते. पण यंदा मात्र साधेपणाने उत्सव करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.
प्रारंभी मंडळाचे अध्यक्ष अशोक पोतदार यांनी प्रास्ताविक केले. सचिव शिवाजी हंडे यांनी ठरावांची माहिती दिली. या प्रसंगी राजकुमार कलघटगी, अमोल बेंदे, जुगलकिशोर जोशी, शेखर हंडे, शाम सुतार, विजय मोहीते, सुभाष कांबळे, तानाजी भेकणे, गोपाल पुरोहित, यशराज हंडे, ओमप्रकाश राजगुरु, हेमंत सुर्यवंशी उपस्थित होते. रामकुमार जोशी यांनी आभार मानले.