लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला श्रीराम जन्मोत्सव ः सोहळय़ाचे दूरदर्शनवर पहिल्यांदाच थेट प्रसारण
@ वृत्तसंस्था / अयोध्या
भगवान श्रीरामाची नगरी अयोध्येत जन्मोत्सव सोहळय़ाकरता लाखो भाविकांनी हजेरी लावली. येथील श्रीराम जन्मभूमी मंदिरात विराजमान श्रीरामलल्लावर सुमारे 5 दशकांनी एक क्विंटल पंचामृताने अभिषेक करण्यात आला. श्रीराम जन्मभूमीवरून पहिल्यांदाच श्रीरामजन्मोत्सवाचे दूरदर्शनवर थेट प्रसारण झाले असून याचा लाभ कोटय़वधी लोकांनी घेतला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमधून व्हर्च्युअल स्वरुपात अयोध्येच्या रामजन्मोत्सवात भाग घेतला आहे. याचबरोबर देशभरात अनेक ठिकाणी हा सण मोठय़ा उत्साहात पार पडला असून शोभायात्रांचे आयोजन करत यात भाविकांनी भाग घेतला आहे.
रामनगरी अयोध्या जय श्रीरामच्या उद्घोषात हरवून गेली आहे. शरयू तटापासून प्रमुख मठ मंदिरांमध्ये श्रद्धेचा महापूर दिसून आला आहे. मठ मंदिरांमध्ये धार्मिक विधी करण्यात आले आहेत. कनक भवन आणि राम जन्मभूमीवर मोठय़ा संख्येत भाविक पोहोचले होते. अयोध्या नगरीत मोठय़ा जल्लोषात 175 मंदिरांमध्ये एकाचवेळी भगवान रामाचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
राम मंदिर उभारणी सुरू झाल्यापासून मागील 2 वर्षे कोरोना महामारीमुळे राम नवमीचा सण मर्यादित भाविकांच्या उपस्थितीतच पार पडला होता. परंतु यावेळी भाविकांनी मोठी गर्दी अयोध्येत केली आहे. पूर्ण शहर राममय वाटावे अशाप्रकारे अयोध्येला सजविण्यात आले होते.
राम जन्मभूमी परिसरात तात्पुरत्या मंदिरात विराजमान रामलल्लाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच मंदिर उभारणीच्या कार्याची पाहणी भाविकांकडून करण्यात आली. रामजन्मभूमीवरून जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचा थेट प्रसारण पहिल्यांदाच करण्यात आले. तसेच मर्यादित संख्येत परंतु पहिल्यांदाच काही भक्त रामलल्लाच्या जन्मोत्सवाच्या आरतीत सामील झाले. अशाचप्रकारे कनक भवन हनुमानगढीच्या दरबारात मोठय़ा संख्येत भाविक पोहोचले.
भाविकांची मोठी गर्दी पाहता प्रशासनाने अनेक प्रकारची तयारी केली होती. यात वाहतूक नियंत्रणासह सुरक्षेकरता पूर्ण मेळा क्षेत्रावर ड्रोन तसेच सीसीटीव्ही कॅमेऱयांद्वारे देखरेख ठेवण्यात आली. लवकरात लवकर भव्य राममंदिराचे दर्शन घडावे आणि शतकांपासूनचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण व्हावे प्रार्थना भाविकांनी केली आहे.