झोपडपट्टी निर्मूलन योजनेंतर्गत निधी मंजूर करण्याची मागणी : मनपा आयुक्तांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
रामनगर वड्डर छावणी वसाहतीमधील घरांची पडझड झाली आहे. या घरांच्या पुनर्बांधणीसाठी सहाय्यधन देण्यात यावे, अशी मागणी महानगरपालिकेकडे करण्यात आली होती. पण प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. झोपडपट्टी निर्मूलन योजनेंतर्गत घरांची पुनर्बांधणी करून देण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन मंगळवारी महापालिका आयुक्तांना देण्यात आले.
वड्डर छावणीमध्ये अनेक वर्षापासून रहात असून कायमस्वरूपी रहिवासी आहोत. पण घरांचे नुकसान झाल्याने कुटुंबासह सदस्यांना पडक्मया झोपडय़ांमध्ये रहावे लागत आहे. त्यामुळे येथील परिस्थितीची पाहणी करून घर बांधण्यासाठी निधी द्यावा, अशी मागणी महापालिकेकडे करण्यात आली होती. पण अद्याप कोणतीच दखल घेण्यात आली नाही. झोपडपट्टी निर्मूलन योजनेंतर्गत घरे बांधण्यासाठी निधी दिला जातो. या योजनेंतर्गत रामनगरमधील घरांची पुनर्बांधणी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांच्याकडे करण्यात आली. यावेळी रामनगर वड्डर छावणीमधील रहिवासी उपस्थित होते.