मंदिर उभारणी सुरू झाल्यावर पहिलीच रामनवमी
वृत्तसंस्था / अयोध्या
भगवान श्रीराम यांच्या मंदिराची उभारणी सुरू झाल्यानंतरची ही पहिलीच रामनवमी आहे. काही दिवसांपूर्वी सरकारपासून साधू-संत 21 एप्रिल रोजी रामनवमी भव्य प्रकारे साजरी करण्याची तयारी करत होते. पण कोरोनाच्या वेगवान संक्रमणाने या उत्साहावर पाणी फिरले आहे. मागील 24 तासांमध्ये अयोध्येत एकूण 200 बाधित सापडले आहेत. येथील एकूण रुग्णांची संख्या 1311 वर पोहोचली आहे.
भाविकांशिवाय मंदिरात पुजेपुरती रामनवमी मर्यादित राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मागील वर्षी 2020 मध्येही लॉकडाऊनमुळे रामनवमीचे कार्यक्रम आयोजित होऊ शकले नव्हते. सलग दुसऱया वर्षी अयोध्येत रामनवमीचा मेळा होणार नाही.
अत्यंत मर्यादित संख्येत लोक रामलल्लाचे दर्शन करण्यासाठी पोहोचत आहेत. त्यांना 5-5 च्या तुकडय़ांमध्येच प्रवेश दिला जातोय. सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर अनिवार्य आहे. अशा स्थितीत रामनवमीचे पर्व केवळ औपचारिक स्वरुपात साजरे करण्यात येणार असल्याचे उद्गार राम मंदिराचे पुजारी सत्येंद्र दास यांनी काढले आहेत. भाविकांनी जेथे भगवान रामाची पूजा होईल तीच अयोध्या समजावी, असे आवाहन महंत मैथिली शरण यांनी केले आहे.
कोविड-19 निगेटिव्ह अहवाल असलेल्यांनाच मंदिरात प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती अयोध्येचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक शैलेश पांडे यांनी दिली आहे. प्रशासकीय अधिकाऱयांनुसार रामनवमीपूर्वी तपासणी मोहीम राबवून अयोध्येच्या सीमा बंद करण्यात येणार आहेत.
योजनांवरही पडला प्रभाव
राम मंदिराची उभारणी सुरू झाल्यावर अयोध्येला पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी सरकारने अनेक प्रकल्प हाती घेतले होते. पण कोरोनामुळे हे सर्व प्रकल्प प्रभावित झाले आहेत. तर काही प्रकल्पांचे काम वेगाने सुरू करण्याचा प्रयत्न झाला आहे. अयोध्येतील बसस्थानक, कोरियन राणीचे पार्क, राष्ट्रीय महामार्ग सहापदरी करणे, अयोध्येच्या सभोवती रिंग रोडची निर्मिती, 150 तीर्थस्थळांचा विकास, सुमारे 1200 एकर क्षेत्रात नव अयोध्येची निर्मिती, अयोध्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरू करण्यात आले आहे.
सर्वात उंच पुतळा
251 मीटर उंचीच्या भगवान श्रीराम यांच्या पुतळय़ाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 4 वर्षांपूर्वी दीपोत्सवानंतर केली होती. मागील 2 वर्षांमध्ये अयोध्येत विकासाच्या अनेक योजना सुरू झाल्या, पण त्यातील बहुतांश कार्यान्वित झालेल्या नाहीत.