बोकडबाग दहाजण संघर्ष समितीचे पंचायतीला निवेदन : सरपंचाने तात्काळ बजावली नोटीस
प्रतिनिधी / फोंडा
रामनाथी येथील एका नामांकित आश्रम संस्थेच्या इमारतीच्या पाठिमागील डेंगरमाथ्यावरील जागेत बेकायदेशीरित्या सपाटीकरणाचे प्रकार सुरू असल्याचे निवेदन बोकडबाग दहाजण संघर्ष समितीतर्फे नुकतेच बांदोडा पंचायतीला सादर करण्यात आले. सरपंच राजेश नाईक यग्नांनी ग्रामस्थांची गाऱहाणी ऐकून घेतल्यानंतर यासंबंधी पंचायतीकडून कोणतीही परवानगी डोगर सपाटीकरण करताना घेतली नसल्याचे आढळल्याने तात्काळ नोटीस बजावण्याचे सोपस्कर पुर्ण केले आहे.
काल शुक्रवारी दुपारी सुमारे शंभराहून अधिक ग्रामस्थांनी बांदोडा पंचायतीकडे जाब विचारण्यासाठी मोर्चा वळविला. बोकडबाग दहाजण संघर्ष समितीतर्फे मागील काही वर्षापासून हा लढा सुरू आहे. येथील स्थानिक आमदारांचा वरदहस्त असलेल्या आश्रमातर्फे डेंगरमाथ्यावर साधकांसाठी वसाहत निर्माण करण्यात येत असल्याचा आरोप आहे. मडकई मतदारसंघात विकासकामांच्या नावाने गगनचुंबी इमारती बांधण्यात येत असून फक्त बिगरगोमंतकीयासाठी वसाहती निर्माण करण्यात येत असल्याचा आरोप येथील स्थानिकांनी केला आहे. आश्रमातील मलनिस्सारणाची जोडणी थेट शेतात सोडण्यात आल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला असून त्याचीही पाहणी संबंधित खात्याने करावी अशी मागणी केली आहे.
वेळप्रसंगी उग्र आंदोलन करू – ग्रामस्थांचा निर्धार
डेंगरमाथ्यावरील जमीनीत काजू, पोफळी, तसेच इतर वनौषधीची झाडे आहेत.डोंगराला लागूनच सार्वजनिक स्मशानभूमी आहे, जमीन धार्मिक विधीसाठीही महत्वाची असून गडोत्सवातही या जमिनीचे विशेष महत्च आहे. डोंगरच्या पायथ्याशी असलेल्या शेतीसाठीही पाण्याचे स्त्राsत असलेल्या झरीचाही उगम याच डोगरमाथ्यापासून होत असल्याचे यावेळी निदर्शनास आणून दिलेले आहे. बोकडबाग संघर्ष समितीने वेळोवेळी संबंधित खात्याच्या निदर्शनास आणून दिलेले आहे. मात्र कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे, डेंगरमाथ्याला लागून असलेली कोमुनिदादची जमीनही गिळकृत करण्याचा डाव असल्याचा संशय स्थानिकांनी केला आहे.
विकासाच्या नावाने गगनचुंबी इमारती
बांदोडा पंचायत क्षेत्रात गगनचुंबी इमारती बांधण्याचा प्रकल्प मोठय़ा प्रमाणात सुरू असून अशा प्रकल्पांना स्थानिक राजकारण्यांनी उघड अभय दिलेले आहे. अश्या इमारती उभारून बिगरगोमंतकीयांची भरणा करण्याची मोहीम सद्या या भागात सुरू असल्याचा आरोप येथील स्थानिकांनी केला आहे. डेंगरमाथ्यावरील जमीन राखून ठेवण्यासाठी वेळप्रसंगी उग्र आंदोलन करण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.