प्रतिनिधी / सातारा :
राजकारणात कधी कोण कोणाचा शत्रू नसतो, तसा मित्रही नसतो. त्याचा प्रत्यय साताऱ्यातील जनतेने वारंवार अनुभवला आहे. एकमेकांच्या जीवावर उठलेले नेते पुन्हा एकेमकांना कधी घास भरवतील हे सांगता येत नाही. त्याचाच प्रत्यय आजही सातारकरांना आला. फलटणचे राजे म्हणजेच विधान परिषदेचे सभापती रामराजे आणि साताऱ्याचे भाजपाचे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्यात लोणंद येथील सोना अलायंझ कंपनीवरुन ज्या शासकीय विश्रामगृहात विस्तव पेटला होता. दोघांनी एकमेकांच्या विरोधात आरोपाच्या तलवारी उपसल्या होत्या. आता त्याच शासकीय विश्रामगृहाच्या बंद कमऱ्यात तलवारी म्यान करुन असा कोणता तह दोघांमध्ये झाला, याची उत्सुकता साताऱ्याच्या प्रजेला लागली आहे. त्यावर रामराजे म्हणाले, आमचे पिढय़ानपिढयाचे संबंध जपण्याचे आम्ही काम करतो आहे.
उदयनराजे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांचे कधीही जुळले नाही. खरा विस्तव पडला तो लोणंद येथील सोना अलायंझ कंपनीतील कामगार प्रश्नांवरुन साताऱ्याच्या शासकीय विश्रामगृहात. यावरून साताऱ्यात उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी नाक्यावर रामराजेंचा प्रतिकात्मक पुतळय़ाचे दहन केल्याचे आजही सातारकरांना चांगले आठवते. दोन्ही नेते एकमेकांशी एकाच पक्षात असून कधीही चकार शब्दाने बोलत नव्हते. दोघांमध्ये विस्तव फुलला होता. परंतु गतवर्षी याच शासकीय विश्रामगृहात हे दोन्ही नेते एकत्र भेटले.अन् बिघडलेले संबंध पुन्हा जुळल्याचे सातारकरांनी पाहिले. त्यानंतर आज एका वर्षानंतर पुन्हा हे दोघे त्याच शासकीय विश्रामगृहात एकत्र आले अन् दोघांमध्ये कमराबंद चर्चा झाली.