प्रतिनिधी / सातारा :
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे धुमशान सध्या सुरु असून या निवडणुकीसाठी बँकेच्या विविध मतदारसंघातून तब्बल 141 जणांनी अर्ज दाखल केलेले आहेत. दि. 10 रोजी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत असून या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून तोफा डागत असलेल्या खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी सोमवारी फलटणमध्ये जाऊन राज्य विधानपरिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास दीड तास बंद दाराआड चर्चा झाल्याने ही भेट जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली.
जिल्हा बँकेचे निवडणुकीचे धुमशान सुरु झाल्यानंतर अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी कृषी पणन मतदारसंघातून आमदार मकरंद पाटील व शिवरुपराजे खर्डेकर तर सोसायटी मतदारसंघातून महाबळेश्वर तालुक्यातून राजेंद्र राजपुरे यांच्या निवडीही बिनविरोध झाल्या आहेत. त्यानंतर उर्वरित मतदारसंघांचे काय होणार निवडणूक लागणार की निवडणूक बिनविरोध होणार याची उत्सुकता जिल्हय़ात आहे. जिल्हा बँक निवडणुकीचा आढावा राष्ट्रवादीचे सुप्रिमो यांनी खुद्द बारामतीत घेतला. या बैठकीत विविध मतदारसंघांचा आढावा घेतल्यानंतर शरद पवार यांनी उदयनराजेंची जबाबदारी शिवेंद्रराजेंच्यावर सोपवण्याच्या सूचना केल्या होत्या. आता अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत एक दिवसावर येवून ठेपली असताना नेहमीप्रमाणे हटके स्टाईलने खासदार उदयनराजे भोसले यांनी सोमवारी खळबळ उडवून दिली. त्यांनी चक्क फलटणला प्रयाण केले आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्या लक्ष्मी-विलास निवासस्थानात त्यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये बंद खोलीत तब्बल दीड तास चर्चा झाली. दोन्ही नेत्यांमध्ये नेमकं काय खलबतं झालं हे समोर आलं नाही.