अयोध्येतील भव्य राममंदिराचे निर्माण कार्य वेगात, ऑक्टोबरपर्यंत प्रथम स्तराचे कार्य पूर्ण होणार
अयोध्या / वृत्तसंस्था
पुढच्या वर्षाच्या 22 एप्रिलला अयोध्येत रामजन्मभूमीच्या स्थानावर निर्माण होत असलेल्या भव्य राममंदिरात रामल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. त्याच दिवसापासून भक्तांना दर्शनासाठीही अनुमती मिळणार आहे. ही घोषणा उत्तर प्रदेश सरकारमधील अर्थमंत्री सुरेश खन्ना यांनी शुक्रवारी केली आहे.
ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली. अनेक दशके देशातील आणि जभरातील रामभक्त ज्या शुभदिनाची आतुरतेने प्रतीक्षा करीत होते, तो दिवस आता नजीक आला आहे. 22 जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा भव्य राममंदिराच्या गर्भगृहात केली जाईल. त्यानंतर भक्त आणि भाविक तेथे पूजा आर्चा करु शकतील. मंदिराचा प्रथम स्तर ऑक्टोबरपर्यंत पूर्ण केला जाणार आहे.
पारंपरिक पद्धतीने होणार प्राणप्रतिष्ठा
रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा गर्भगृहात पांरपरिक पद्धतीने पूजापाठ आणि मंत्रोच्चारात केली जाणार आहे. गर्भगृहात रामलल्लाची जुनी मूर्ती तसेच नवी भव्य मूर्ती अशा दोन्ही मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या कार्यक्रमाला रामभक्तांचा प्रचंड प्रतिसाद अपेक्षित आहे. त्यादृष्टीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती राममंदिर निर्माण न्यासाकडून देण्यात आली.
प्रथम स्तर ऑक्टोबरपर्यंत
राममंदिराच्या प्रथम स्तराचे निर्माण कार्य येत्या ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार आहे. या स्तरावर ‘राम दरबारा’ची स्थापना केली जाणार आहे. तर त्याच्या वरचा द्वितीय स्तर रिक्त असेल. हा स्तर मंदिराची उंची आणि भव्यता वाढविण्यासाठी उपयोगात आणला जाणार आहे, अशीही माहिती न्यासाच्या वतीने देण्यात आली आहे.
….अनेक स्थानांहून शीला
भगवान श्रीरामांच्या मूर्तीसाठी अनेक स्थानांहून शीला आणण्यात आल्या आहेत. त्यांच्यात नेपाळच्या गंडक नदीमधील शीलांचाही समावेश आहे. या शीला शालीग्राम शीला म्हणून प्रसिद्ध आहेत. गर्भगृहात ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, ती मूर्ती भगवान श्रीरामांच्या बालपणीची असेल. प्राचीन गंथांमध्ये बालरामाचे जे वर्णन करण्यात आले आहे, त्यानुसारच ही मूर्ती निर्माण करण्यात येणार आहे.