अयोध्या-रामेश्वरम रेल्वेत वेटरचा भगवा पोशाख
वृत्तसंस्था/ उज्जैन
रामायण सर्किट स्पेशल ट्रेनमध्ये सेवा प्रदान करणाऱया वेटर्सच्या पोशाखावर उज्जैनच्या साधू-संतांनी आक्षेप घेतला आहे. या रेल्वेतील कर्मचाऱयांनी भगवे कपडे, धोती, पगडी आणि रुद्राक्षाची माळा घातली आहे. सोशल मीडियावर प्रसारित व्हिडिओत वेटर्स संतांच्या वेशभूषेत लोकांना जेवण वाढत असल्याचे दिसून येते.
हा प्रकार आमचा अपमान करणार आहे. रेल्वेतील कर्मचाऱयांना अन्य पोशाख देण्यात यावा असे संतांचे म्हणणे आहे. उज्जैनमधील संतांनी रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहून 12 डिसेंबरपासून सुरू होणाऱया रेल्वेच्या दुसऱया फेरीला विरोध करण्याचा इशारा दिला आहे. नाराज संतांनी रेल्वे रोखणार असल्याचेही म्हटले आहे.
लवकरात लवकर वेटर्सची वेशभूषा बदलण्यात यावी, अन्यथा 12 डिसेंबर रोजी रवाना होणाऱया पुढील रेल्वेला संत समाज विरोध करेल आणि रेल्वेसमारे हजारो हिंदूंसोबत निदर्शने करू असे अखाडा परिषदेचे माजी महामंत्री परमहंस अवधेश पुरी महाराज यांनी म्हटले आहे.
दिल्लीच्या सफदरगंज रेल्वेस्थानकावरून धावणाऱया या एक्स्पेसचा पहिला थांबा अयोध्येत आहे. येथूनच धार्मिक यात्रा सुरू होते. अयोध्येतून भाविकांना रस्ते मार्गाने नंदीग्राम, जनकपूर, सीतामढीमार्गे नेपाळमध्ये नेण्यात येते. त्यानंतर रेल्वेद्वारे भाविकांना काशी येथे नेण्यात येते. तेथून बसेसद्वारे काशीमधील प्रसिद्ध मंदिरांसह प्रयाग, श्रृंगवेरपूर आणि चित्रकूटची यात्रा घडविली जाते.
चित्रकूटमधून ही रेल्वे नासिक येथे पोहोचते. नाशिक येथून किष्किंधा नगरी हंपीमधील अंजनी पर्वतावरील श्री हनुमान जन्मस्थळाचे दर्शन करविण्यात येते. या रेल्वेचा अंतिम थांबा रामेश्वरम आहे.