राष्ट्रपती कोविंद यांचा दावा ः हनुमानगढीला
अयोध्या / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेश दौऱयाच्या चौथ्या दिवशी रविवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद अयोध्येत पोहोचले. याप्रसंगी त्यांनी अयोध्येतील रामकथा पार्कचे उद्घाटन केले. त्यानंतर आपल्या भाषणात त्यांनी ‘रामाशिवाय अयोध्या नाहीच’ असे सांगत ‘जेथे अयोध्या आहे तेथे राम आहे. भगवान राम या शहरात कायमचे विराजमान आहेत, म्हणून हे ठिकाण खऱया अर्थाने अयोध्या आहे’ असे ते म्हणाले.
रामकथेचे महत्त्व आपणा सर्वांना माहित आहे. भारतीय जीवनमूल्यांचे आदर्श आणि उपदेश रामायणातील शिकवण आहे. रामायण कॉन्क्लेव्ह आयोजित करून कला आणि संस्कृतीच्या माध्यमातून रामायण लोकांपर्यंत नेण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने सुरू केलेल्या मोहिमेसाठी मी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या टीमचे कौतुक करतो, असे राष्ट्रपती म्हणाले. रामायण कॉन्क्लेव्हच्या उद्घाटन समारंभात लोकगायिका मालिनी अवस्थी यांनी गाण्यांचे चमकदार प्रदर्शन केले. यावेळी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले. कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांनी जय श्री रामचा जप केला.
राष्ट्रपतींच्या हस्ते रुद्राक्ष झाडाचे रोपण
राष्ट्रपतींनी अयोध्येच्या कोतवाल हनुमानगढीमध्ये हनुमंतलाल आणि रामजन्मभूमी संकुलात बसलेल्या रामलल्लाचे दर्शन घेतले. त्यानंतर रामलल्लापासून काही अंतरावरच रुद्राक्षचे झाडही लावले. रुद्राक्ष हे एक औषधी वृक्ष आहे आणि आयुर्वेदातही त्याचे विशेष स्थान आहे. एक वर्षापूर्वी, 5 ऑगस्ट रोजी, राम मंदिर बांधकामाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला आलेल्या पंतप्रधान मोदी यांनी रामजन्मभूमी संकुलात पारिजाताचे झाड लावले होते.
राष्ट्रपतींनी दुपारी 2.35 ते 3.15 या वेळेत हनुमानगढी आणि रामलल्लाचे दर्शन घेतले. त्यानंतर सायंकाळी ते विशेष रेल्वेने अयोध्या जंक्शनवरून लखनौसाठी रवाना झाले. यावेळी देशाच्या प्रथम महिला सविता कोविंद, राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि डॉ दिनेश शर्मा उपस्थित होते.