ठिकठिकाणी नगरात सजावट, रांगोळी, श्री रामाचे फोटो घरासमोर ठेवून पूजन ः ढोल, ताशांच्या गजरात शुभारंभ
प्रतिनिधी / खानापूर
अयोध्येतील श्री राम मंदिर निधी संकलन अभियानांतर्गत संपूर्ण खानापूर शहरामध्ये राम मंदिरसाठी निधीचे संकलन करण्यात आले. यावेळी खानापूर शहराचे 8 विभाग करून निधी संकलन करण्यात आले. यावेळी ठिकठिकाणी नगरात सजावट, रांगोळी, श्री रामांचा फोटो घरासमोर ठेवून पूजन करण्यात आले. विविध गल्ल्यांमध्ये लहान मुले श्री रामांच्या वेशभूषेत घरोघरी संपर्क साधत होती. श्री लक्ष्मी मंदिर येथे लक्ष्मी वसतीच्या कार्यकर्त्यांनी निधी संकलन पुस्तकांचे पूजन, श्री विठ्ठल वसतीच्या कार्यकर्त्यांनी श्री राम मंदिर येथे पूजन, श्री रवळनाथ वसती-श्री रवळनाथ मंदिर येथे पुस्तकाचे पूजन, श्री मऱयाम्मा वसती-श्री मऱयाम्मा मंदिर येथे ढोल, ताशा यांच्या गजरात शुभारंभ करण्यात आला. यावेळी शेकडो रामभक्त उपस्थित होते.
एकाच दिवशी खानापूर शहरातील सर्व घरांशी संपर्क साधण्यात आला. त्यासाठी गटागटातून कार्यकर्ते दिवसभर खानापूर शहरातील विविध गल्लोगल्ली दिसून येत होते. त्यामध्ये महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग दिसून येत होता. यावेळी श्री रामांच्या घोषणा देण्यात येत होत्या. यामुळे संपूर्ण खानापूर शहर हे राममय बनले होते. भगव्या टोप्या, भगव्या शाल अशा विविध वेशभूषा केल्या होत्या. यावेळी कु. लक्षित सर्वज्ञ कपिलेश्वरी व कु. शौर्य पंडित ओगले या दोन बालकांनी श्री रामाचा वेष परिधान केल्याने खास आकर्षण ठरले होते. श्री मऱयाम्मा देवी वसतीच्या कार्यकर्त्यांनी विशेष नेसरगीहून सनई-चौघडा पथक आणले होते. त्यामुळे संस्कृतीमय वातावरण निर्माण झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री बिट्टाप्पा नाईक हे मार्गदर्शन करीत होते.
ग्रामीण भागातही निधी संकलन अभियानास प्रारंभ
करंबळ येथील श्री लक्ष्मी मंदिरात पुस्तकांचे पूजन करण्यात आले. तीन गटात विभागणी करून सर्व कार्यकर्ते घरोघरी जाऊन निधी संकलन करत होते. रुमेवाडी, कांजळे, असोगा, मन्सापूर, गणेबैल कुटिन्होनगर, हत्तरगुंजी, रामगुरवाडी, हलकर्णा, कौंदल, जळगे इत्यादी अनेक गावांमध्ये अयोध्येतील श्री राम मंदिरासाठी निधी संकलन करण्यात आला आहे. आरती म्हणून श्री राम जय राम जय जय रामाचा नामघोष करण्यात आला. युवा वर्गाने ढोल, ताशांच्या गजराने संपूर्ण करंबळ गाव दणाणून सोडले. सर्व ठिकाणी उत्स्फूर्तपणे श्री राम भक्त निधी समर्पित केला.
खानापूर को-ऑप. बँकेकडून 21 हजार रुपये
खानापूर शहरात निधी संकलित करताना विविध संघ-संस्थांनीही मदतीचा हात पुढे पेला आहे. त्यामध्ये खानापूर को-ऑप. बँकेने 21 हजाराचा निधी दिला. बँकेचे चेअरमन परशराम गुरव, मुख्य व्यवस्थापक उमेश बर्वे तसेच बँकेचे संचालक मंडळ यावेळी उपस्थित होते. शहराबरोबरच तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये राम मंदिरासाठी निधी संकलनाचे काम सुरू आहे. या कार्यासाठी गरिबांपासून श्रीमंतापर्यंत सर्वांचेच सहकार्य मिळत आहे.