विश्व हिंदू परिषदेने दिली माहिती : अयोध्येत मंदिराची उभारणी होणार
प्रतिनिधी / हुबळी
अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी येथे भगवान श्रीरामांचे भव्य मंदिर उभारण्याकरिता निधी संकलनाचे अभियान विश्व हिंदू परिषद 15 जानेवारीपासून सुरू करणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केशव पुंज या कार्यालयात प्रसारमाध्यम प्रतिनिधींना यासंबंधी माहिती देण्यात आली आहे.
5 फेब्रुवारीत कर्नाटकातील 27,500 गावांमधील ‘रामभक्तां’च्या 90 लाख घरांना भेट देत निधी जमविला जाणार असल्याचे विहिंपचे विभागीय संघटन सचिव केशव हेगडे यांनी रविवारी म्हटले आहे. कर्नाटकातून नेमका किती निधी एकत्रित करण्यात येणार हे मात्र त्यांनी सांगितले नाही. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून भगवान रामाचे मंदिर उभारण्यात येणार असून याकरिता 1,100 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगत हेगडे यांनी हा निधी स्वयंप्रेरणेने देणे अपेक्षित असून याकरिता कुठलेच लक्ष्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.
श्रीराम मंदिर उभारणीसाठी शासकीय निधीचा वापर न करण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला आहे. भगवान रामावर श्रद्धा असलेले भाविक किमान 10 रुपयांपासून देणगी देऊ शकतात. निधी संकलक 2000 रुपयांपेक्षा अधिक देणगीसाठी संबंधिताला पावती सोपविणार आहे. जमविण्यात येणारा निधी संबंधित उद्देशासाठीच खर्ची पडेल याची खातरजमा करण्यात आल्याचे हेगडे म्हणाले.
पुढील 3-4 वर्षांमध्ये भव्य मंदिर उभे राहण्याची आशा आहे. मंदिराच्या उभारणीसाठी स्टेट बँक ऑफ इंडियातील बचत खाते क्रमांक 39161495808 (आयएफएससी कोड : एसबीआयएन 0002510) यावर देणगी जमा करू शकतात. या देणगीकरिता भाविकांना कलम 80 जी (2)(ब) अंतर्गत प्राप्तिकरात सवलत मिळू शकते, असे त्यांनी म्हटले आहे. या पत्रकार परिषदेवेळी रामनगौडर, डी. जी. मालगी आणि कृष्णा जोशी उपस्थित होते.