‘झरोख्या’तून पाहता येणार निर्मितीकार्य
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
रामलल्लाच्या भाविकांसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ट्रस्ट आता अयोध्या राम मंदिर उभारणीच्या प्रक्रियेशी रामभक्तांना जोडणार आहे. राम जन्मभूमी परिसरातच तात्पुरत्या मंदिरात विराजमान रामलल्लाच्या दर्शनमार्गावरच भाविकांसाठी 5 फूट रुंद आणि 5 फूट लांबीचा ह्यूपॉइंट उपलब्ध केला जाणार आहे. या ठिकाणाहून भाविक रामलल्लाच्या मंदिर उभारणीला पाहू शकणार आहेत.
या ठिकाणाला ट्रस्टने ‘राम झरोखे’ नाव दिले आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने आता मंदिर उभारणीची प्रक्रिया भाविकांना दाखविण्यासाठी ह्यूपॉइंट सुरू केला आहे. मंदिर उभारणीसाठी सध्या पाया रचण्याचे काम सुरू आहे. मंदिराचे निर्मितीकार्य पाहून भाविक आनंदी होत आहेत. 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रामलल्लाचे भव्य मंदिर उभारण्यात येत असल्याने भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे.
भाविकांच्या इच्छेनुसार निर्णय
अयोध्येत येणाऱया भाविकांना त्यांच्या आराध्य दैवताच्या मंदिराच्या उभारणीच्या प्रक्रियेची कल्पना यावी अशी व्यवस्था करण्याचा निर्णय ट्रस्टच्या बैठकीत घेण्यात आला होता. यानुसारच रामलल्लाच्या दर्शन मार्गावर राम झरोखेची निर्मिती झाली आहे. तेथून मंदिर उभारणीचे काम पाहता येते. राम मंदिर उभारणीचे काम कसे सुरू आहे? किती प्रगती झाली हे जाणून घेण्याची इच्छा भाविकांकडून व्यक्त होत होती. अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाला एक वर्षे पूर्ण झाले आहे. मागील वर्षी 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मंदिर उभारणीच्या कार्याचा शुभारंभ झाला होता. अयोध्येत आता भव्य मंदिराची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे.