वृत्तसंस्था /अयोध्या :
अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमीवर पुन्हा एकदा खोदकामाची तयारी करण्यात आली आहे. परंतु कुठल्याही पुरातात्विक पुराव्यासाठी नव्हे तर यावेळी नव्या राम जन्मभूमी मंदिराचा पाया रचण्यासाठी हे काम होणार आहे. खोदकामादरम्यान ऐतिहासिक अवशेष समोर येण्याची अपेक्षा आहे.
2003 मध्ये पुरातत्व विभागाच्या उत्खननादरम्यान प्राचीन मंदिराचे गर्भगृह आढळलेल्या ठिकाणीचे नव्या मंदिराचे गर्भगृह निर्माण केले जात आहे. जन्मभूमीचे सपाटीकरण करताना प्राचीन मंदिराचे महत्त्वपूर्ण अवशेष समोर आले आहेत. जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर राम मंदिराच्या पायासाठी खोदकाम सुरू झाले आहे. लार्सन अँड टुब्रोच्या पथकाने खोदकाम सुरू केले आहे. 24 हजार चौरस फूटांच्या नव्या भव्य मंदिर उभारणीनंतर सीता रसोई आणि मानस भवनचे अस्तित्व संपुष्टात येईल. मानस भवनच्या जागी नव्या मंदिराचे सिंहद्वार निर्माण होणार आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या समितीची बैठक 20 रोजी आयोजित होणार आहे.