अयोध्या –
अयोध्येत भव्य राममंदिर उभारले जाण्याची रामभक्तांची प्रतीक्षा आता लवकरच संपुष्टात येणार आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी पाया खोदाईचे काम सुरू झाले आहे. फेब्रुवारी महिन्यापासून दगड रोवण्याचे काम सुरू होणार असल्याची अपेक्षा आहे. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांच्यानुसार मंदिराची मजबुती तसेच दीर्घायू विचारात घेत अभियंत्यांनी पायाचे सर्वोत्तम डिझाइन तयार केले आहे. पायाचे डिझाइन अंतिम झाल्यावर आता त्याच्या खोदाईचे काम सुरू करण्यास सुमारे 7 महिन्यांनी यश मिळाल्याचे राय म्हणाले. अयोध्येत भव्य राममंदिराच्या मजबुतीवरून ट्रस्टच्या अनेक बैठका पार पडल्या आहेत. या बैठकांमध्ये विविध पैलूंवर विचारविनिमय करण्यात आला आहे. मंदिर उभारणीच्या पायासाठी अनेकदा परीक्षण झाले आहे. जमिनीखाली भूसभूसीत वाळू आणि पाणी असल्याने सिमेंटच्या पिलर्सचा वापर योग्य नाही. अशास्थितीत प्राचीन पद्धतीने दगडांचा वापर करणे अधिक संयुक्तिक ठरणार असल्याचे तज्ञांनी म्हटले हेते.