अयोध्येत लवकरच भूमिपूजन : देणगीच्या सुरक्षेसाठी केंद्रीय दल तैनात करण्याची वेळ
वृत्तसंस्था / अयोध्या
राम मंदिर भूमिपूजन सोहळय़ाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या सोहळय़ात सहभागी होणार असल्याने केंद्रीय सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. परंतु केंद्रीय सुरक्षा दलाला एक अतिरिक्त कार्य सोपविण्यात आले आहे. महनीयांच्या सुरक्षेत तैनात केंद्रीय दलाला अयोध्येत सोन्या-चांदीच्या विटा आणि दागिन्यांचे रक्षण करावे लागत आहे.
अयोध्येत राम मंदिर उभारणीचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने मोकळा केल्यापासून रामभक्तांकडून विविध स्वरुपात सोने-चांदीच्या स्वरुपात देणगी दिली जात आहे. सोन्या-चांदीच्या विटांसह मोठय़ा प्रमाणात दागिनेही भक्तांकडून पाठविले जात आहेत. भूमिपूजनाच्या तारखेची घोषणा झाल्यावर ही संख्या अधिकच वाढली आहे. मोठय़ा प्रमाणात प्राप्त होणाऱया सोन्या-चांदीचा अखेर वापर कुठे करावा, असा प्रश्न ट्रस्टच्या सदस्यांसमोर उभा ठाकला आहे.
आवाहनाची वेळ
सोने-चांदीची करावी लागणारी सुरक्षा पाहता ट्रस्टकडून मंदिर उभारणी करण्यासाठी निधीच्या स्वरुपात सहकार्य करण्याचे आवाहन रामभक्तांना करण्यात आले आहे. ट्रस्टने यापूर्वी बँक खात्याचा तपशील जाहीर केला असून त्याच्या मार्फत भक्त सहकार्य करू शकतील, असे ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी चित्रफितरुपी संदेशाद्वारे सांगितले आहे.
भूमिपूजनापूर्वी भक्तांना संदेश
5 ऑगस्ट रोजी भूमिपूजनावेळी अयोध्येत पोहोचण्यासाठी आतुर होऊ नका, असे आवाहन श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने देशभरातील रामभक्तांना केले आहे. लोकांनी संध्याकाळी स्वतःच्या घरांमध्ये दिवे पेटवून या दिव्य क्षणाचे भव्य स्वागत करावे. भविष्यात राम जन्मभूमी मंदिर उभारणी यज्ञात सर्व रामभक्तांना सामील होण्याची संधी मिळावी यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे ट्रस्टने म्हटले आहे.
योगी असणार यजमान
भूमिपूजन सोहळय़ाचे यजमानपद उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे असणार आहे. या सोहळय़ात योगी वगळता अन्य कुठल्याही राज्याच्या मुख्यमंत्र्याला बोलाविण्यात आलेले नाही. कोरोना महामारी संपुष्टात आल्यावर सर्वांना बोलाविले जाणार आहे. भूमिपूजनावेळी मुख्यमंत्र्यांचे संमेलन करवू इच्छित नाही. सोहळय़ादरम्यान सरकारकडून कोरोनासंबंधी देण्यात आलेल्या दिशानिर्देशांचे पूर्णपणे पालन केले जाणार असल्याची माहिती राय यांनी दिली आहे.
5 ऑगस्टला सोहळा
अयोध्येत 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिरासाठी भूमिपूजन करणार आहेत. पंतप्रधानांच्या अयोध्या दौऱयाच्या पार्श्वभूमीवर शहरातील तयारीला वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱयाकरता विशेष सुरक्षा ठेवण्यात येणार आहे.