महंत नृत्य गोपालदास यांना लखनौतील रुग्णालयात हलविले
वृत्तसंस्था / लखनौ
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपालदास (83 वर्षे) यांची प्रकृती रविवारी अचानक बिघडली आहे. त्यांना लखनौतील मेदांता रुग्णालयात हलविण्यात आले आहे. महंत यांना यूरिन आणि फुफ्फुसांमध्ये संक्रमण झाले आहे. तसेच श्वास घेतानाही त्रास जाणवत होता. अयोध्येत जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. त्यानंतर मेदांता रुग्णालयातील डॉक्टरांना त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती देण्यात आली होती.
महंत यांची प्रकृती पाहता मेदांताचे संचालक डॉ. राकेश कपूर यांच्या देखरेखीत उपचार सुरू करण्यात आले आहेत. महंत यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. याचदरम्यान मुख्यमंत्री कार्यालय सातत्याने त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती घेत आहे.
महंतांची ऑक्सिजन पातळी कमी होत 83 वर आली होती. तर खोकला, अधिक प्रमाणात यूरिन डिस्चार्जची समस्या होती. डॉक्टरांनी तपासणीनंतर रात्रीच काही औषधे दिली होती, पण प्रकृतीत अधिक सुधारणा झालेली नसल्याचे कमल नयन दास यांनी सांगितले आहे.
यापूर्वी 9 नोव्हेंबर 2020 रोजी देखील महंत यांची प्रकृती बिघडली होती. तेव्हा देखील श्वास घेण्यास त्रास आणि कमी रक्तदाबाची समस्या निर्माण झाली होती. तसेच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. ते 26 दिवसांपर्यंत गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात दाखल होते.
श्रीकृष्ण जन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष
महंत नृत्य गोपालदास हे श्रीकृष्ण जन्मभूमी न्यासाचे देखील अध्यक्ष आहेत. दरवर्षी ते जन्माष्टमी सोहळय़ासाठी मथुरा येथे जात असतात. मागील वर्षी याच सोहळय़ात सामील झाल्यावर त्यांना कोरोनाची लागण झाली होती.