जनतेची फसवणूक टाळण्यासाठी न्यासाचा पुढाकार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अयोध्येतील रामजन्मभूमीच्या स्थानी भव्य राममंदीर निर्माण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र सरकारने न्यास स्थापन केला आहे. या न्यासाच्या वतीने देशभरातून देणग्या संकलित करण्यासाठी सध्या अभियान सुरू आहे. मात्र, या अभियानाचे कार्यकर्ते असल्याचे भासवत देणगी गोळा करण्याचा प्रयत्न काही बनावट लोकांकडून केला जात आहे. फसवणूक करणाऱया अशा काही लोकांना अटक करण्यात आली असून देशातून अशा अनेक तक्रारी आल्या आहेत.
न्यासाचे अध्यक्ष चंपत राय यांनी यासंबंधी काही सूचना केल्या आहेत. न्यासाच्या वतीने अधिकृतरित्या देणगी गोळा करण्यासाठी कार्यकर्त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. असे दीड लाखांहून अधिक कार्यकर्ते सध्या कार्यरत आहेत. त्यांच्याजवळ ट्रस्टचा सांकेतिक क्रमांक असलेली पावती पुस्तके आहेत. तसेच ही पावती पुस्तके विशिष्ट आकाराची आणि रंगाची आहेत. मात्र काही ठिकाणी बनावट पावती पुस्तकारांच्या आधारे देणग्या गोळा करण्याचे प्रकार घडले आहेत. न्यासाने याची गंभीर नोंद घेतली असून कार्यवाहीस प्रारंभ केला आहे.
उत्तर प्रदेशात मथुरा आणि लखनौ येथे चार जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून काही रक्कम हस्तगत करण्यात आली. कानपूर येथूनही एकाला अटक करण्यात आली. कर्नाटक, महाराष्ट्र व दिल्लीतून अशा घटना समोर आल्या आहेत. न्यासाने 10 रूपये, 100 रूपये आणि 1000 रूपयांची तिकिटे मुद्रित करून अधिकृत कार्यकर्त्यांना दिली आहेत. अधिकृत कार्यकर्त्यांनी सर्व पैसे हिशेबाप्रमाणे न्यासाच्या खात्यात जमा केले आहेत, असे स्पष्ट करण्यात आले.
फसवणूक टाळण्यासाठी सूचना
- फसवणूक टाळण्याचा सर्वोत्तम उपाय इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्रत्यक्ष निधी हस्तांतरीत करणे हा आहे. ऑन लाईन बँकिंग किंवा युपीआय पद्धतीने ती द्यावी. https://srjbtkshetra.org/donation-options/ या वेबसाईटवर बँक खात्यांचे क्रमांक उपलब्ध आहेत.
- प्रत्यक्ष देणगी देण्याऱयांसाठी कूपन आणि पावती अशी दोन कागदपत्रे दिली जातात. कुपनचा रंग गुलाबी आहे. ते 10, 100 आणि 1000 चे आहे. कुपनवर ‘श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यास’ असे स्पष्ट मुद्रित केले आहे. अशा प्रकारचे कुपन नसेल तर ते संशयास्पद आहे असे मानावे.
- ज्यांना 1000 रुपयांहून अधिक रक्कम द्यावयाची आहे, त्यांना पावती दिली जाते. ही पावती देणगी गोळा करणाऱयाच्या हस्ताक्षरात लिहिली जाते. त्याखाली कार्यकर्त्याची स्वाक्षरीही असते, अशी माहिती न्यासाने दिली आहे. कुपनवर 10, 100 किवा 1000 ही संख्या नसेल तर ते कुपन संशयास्पद आहे.