लखनौ / वृत्तसंस्था
अयोध्या विकास प्राधिकरणाकडून राम मंदिराचे नकाशांना मंजुरी देण्यात आली आहे. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राकडून दोन नकाशे सोपवण्यात आले होते. त्या नकाशांना मंजुरी देण्यात आल्याचे अयोध्या विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष एम. पी. अग्रवाल यांनी बुधवारी सांगितले.
मंदिर बांधण्यासाठी ट्रस्टला प्राधिकरणाच्या तिजोरीत विविध वस्तूंसाठी फी म्हणून 2 कोटी 11 लाख 33 हजार 184 रुपये जमा करावे लागतील. यामध्ये बांधकाम उपकराच्या 15 लाख 363 रुपयांचा समावेश नाही, ज्याचा मसुदा ट्रस्ट स्वतंत्रपणे कामगार विभागाला सादर करेल. न्यास फी जमा करण्यासह मंदिर बांधकाम सुरू करण्याच्या सर्व औपचारिकता ट्रस्ट पूर्ण करतील. प्राधिकरणाचे उपाध्यक्ष डॉ. नीरज शुक्ला यांनी मंडळाला मंदिराच्या नकाशाच्या मंजुरीविषयी माहिती दिली. त्यांच्या मते ट्रस्टने संबंधित विभागांच्या मंजुरीने मंदिर नकाशातील सर्व मानके पाळली आहेत. ग्रीन बेल्ट, सेटबॅक, मोकळय़ा क्षेत्रासह 30-मीटर अप्रोच रोड मॅपमध्ये प्रस्तावित आहे.
राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे दोन नकाशे सोपवण्यात आले होते. त्यापैकी एक लेआऊट जो 2 लाख 74 हजार चौरस मीटरचा होते. तर दुसरा मंदिराचा नकाशा होता 12 हजार 879 चौरस मीटरचा होता. संचालक मंडळाच्या बैठकीत 14 सदस्य सहभागी झाले होते. त्यानंतर सर्वसंमत्तीने या नकाशांना मंजुरी देण्यात आली. दरम्यान, मंदिराच्या नकाशाला आता मंजुरी मिळाली असून आता मंदिर उभारणीचे काम लवकरच सुरू करणार असल्याचे ट्रस्टच्या सदस्यांचे म्हणणे आहे.
कामाला गती
राम मंदिराच्या पाच एकर क्षेत्रात असलेल्या जुन्या मंदिरांच्या साफसफाईचे काम सुरू करण्यात आले आहे. एल अँड टी कंपनीची मशीन त्या ठिकाणी पोहोचली असून काम सुरू करण्यात आले आहे. मंदिरासाठी खोदकाम सुरू करून त्याचे पिलर उभारण्याचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे मंदिर ट्रस्ट कार्यालयाचे प्रभारी प्रकाश गुप्त यांनी सांगितले.