खासदार संजय सिंग यांना ठरविले खोटारडे
वृत्तसंस्था/ लखनौ
भगवान राम मंदिर उभारणीसाठी जमीन खरेदीत कथित घोटाळय़ाच आरोप करणारे आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार आणि उत्तरप्रदेश प्रभारी संजय सिंग आता स्वतःच्या पक्षामुळेच अडचणीत आले आहेत. आप युथ ब्रिगेडचे पदाधिकारी रत्नेश मिश्र यांनी संजय सिंग यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. संजय सिंग खोटारडे असून रामविरोधी नेते आहेत. अयोध्येत जमीन खरेदीप्रकरणी मंदिर ट्रस्टला विनाकारण बदनाम करत आहेत. संजय सिंग यांनी पक्षनिधीत फेरफार केल्याचे मिश्र यांनी म्हटले आहे.
राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने जमीन खरेदीत घोटाळा केलेला नाही. तर पक्षातत येणारा निधी संजय सिंग यांच्या मर्जीतील नेत्यांपर्यंतच पोहोचतो. पक्षाच्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांपर्यंत पोहोचू दिले जात नसल्याचे आप नेत्याने म्हटले आहे.
संजय सिंग यांचा खोटारडेपणा जगासमोर आणण्याचे साहस मी दाखविले आहे. वेळ येताच अनेक लोक माझ्यासोबत उभे राहतील असेही मिश्र यांनी म्हटले आहे. रत्नेश मिश्र हे आपच्या युवा शाखेचे प्रदेश प्रवक्ते आहेत.